राजर्षी शाहू महाराज मानधन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना आता प्रतिमाह 5 हजार रुपये मानधन (Appeal to apply online for Rajarshi Shahu Maharaj Maandhan Yojana, senior writers and artists will now get Rs. 5,000 per month as honorarium)

Vidyanshnewslive
By -
0
राजर्षी शाहू महाराज मानधन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना आता प्रतिमाह 5 हजार रुपये मानधन (Appeal to apply online for Rajarshi Shahu Maharaj Maandhan Yojana, senior writers and artists will now get Rs. 5,000 per month as honorarium)


चंद्रपूर :- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेत’ महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना देण्यात येणारे मानधन 5 हजार रुपये प्रतिमाह इतके वाढविण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र साहित्यिक व कलाकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 ते 31 जुलै 2025 या कालावधीत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. योजनेचा उद्देश ज्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांचे जीवनमान केवळ कलेवर किवा साहित्यावर अवलंबून आहे आणि ज्यांना उतारवयात आर्थिक अडचण भासत आहे, त्यांना या योजनेद्वारे आर्थिक सहाय्य करून त्यांच्या कलेचा सन्मान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पात्रतेचे निकष अर्जदाराचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असावे. (विधवा/परित्यक्ता/दिव्यांग अर्जदारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे आहे.) कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान 15वर्षांचे योगदान आवश्यक. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा कमी असावे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदार केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा व त्याचा उदरनिर्वाह केवळ कला/साहित्यावर अवलंबून असावा. अर्ज करण्याची पद्धत 1 जुलै 31 जुलै 2025 या कालावधीत फक्त ऑनलाईन पद्धतीने https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारले जातील. अर्जदार जवळच्या सेतू केंद्रावर किंवा इतर उपलब्ध माहिती तंत्रज्ञान प्रणालीद्वारे अर्ज सादर करू शकतात. आवश्यक कागदपत्रे वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र इ.), आधार कार्ड, तहसीलदार यांनी दिलेला चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट), अर्जदाराचा व लागू असल्यास जोडीदाराचा फोटो, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत (IFSC कोडसह), कला/साहित्य क्षेत्रातील योगदानाचा पुरावा (उदा. प्रमाणपत्रे, पुरस्कार, बातमीपत्रांतील कात्रणे इ.), इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे नोटरी केलेले प्रमाणपत्र, सांस्कृतिक संस्थांचे शिफारसपत्र असल्यास, केंद्र शासनाचा / राज्य शासनाचा / सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुरस्काराचे प्रमाणपत्र असल्यास, साहित्य अकादमी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील सहभागाचे पुरावे असल्यास, नामांकित संस्था / व्यक्तीचे शिफारस पत्र असल्यास, अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र. चंद्रपूर जिल्हातील सर्व पात्र ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील पंचायत समितीशी संपर्क साधावा, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) मिना साळूंके यांनी कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)