घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास रेती वाटपाचा विसापूर येथून शुभारंभ गरिबांचे घरकुलाचे स्वप्न होणार पूर्ण - आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार (Distribution of 5 brass sands free of cost to Gharkul beneficiaries begins from Visapur. The dream of Gharkul of the poor will be fulfilled - MLA Mr. Sudhir Mungantiwar)

Vidyanshnewslive
By -
0
घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास रेती वाटपाचा विसापूर येथून शुभारंभ गरिबांचे घरकुलाचे स्वप्न होणार पूर्ण - आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार (Distribution of 5 brass sands free of cost to Gharkul beneficiaries begins from Visapur. The dream of Gharkul of the poor will be fulfilled - MLA Mr. Sudhir Mungantiwar)


चंद्रपूर :- घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास रेती पुरवठा करण्याच्या योजनेचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथून राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाची सुरुवात झाली. आपण अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या मुलभूत गरजा आहे असं म्हणतो. त्यादृष्टीने स्वतःचं एक घर असणे ही प्रत्येकाच्या जीवनातील एक मूलभूत गरज आणि प्रत्येकाचे स्वप्नही असते. स्वातंत्र्यानंतर अनेकांनी आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहिले. परंतु, अनेकांची ही स्वप्ने अद्यापही अपूर्ण आहेत. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशातील ४ कोटी लोकांना घरे मिळाली आहेत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात २० लाख आणि दुसऱ्या टप्प्यात आणखी २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक गरिबाचे घरकुलाचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे," असा विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. घरकुल बांधकामासाठी सरासरी पाच ब्रास रेती लागते. मात्र रेतीच्या टंचाईमुळे आणि वाढत्या खर्चामुळे लाभार्थ्यांना ३० ते ३५ हजार रुपये अतिरिक्त खर्च करावा लागत होता. परिणामी, शासनाच्या अनुदानातून घरकुल पूर्ण होणे कठीण जात होते. ही अडचण लक्षात घेऊन शासनाने अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ केली असून, प्रत्येक लाभार्थ्याला मोफत पाच ब्रास रेती देण्याचा निर्णय घेतला आहे.
             चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रात घरकुल योजनेअंतर्गत मोफत रेती वाटपात आघाडीवर असून, आज प्रातिनिधिक स्वरूपात १० ब्रास रेतीचे वाटप करण्यात आले. मुल व पोंभुर्णा तालुक्यांमध्येही हे मोफत रेती वाटपाचे कार्य सुरू आहे. मात्र पावसामुळे रेती वाटपाचे कार्यात अडथळा निर्माण झाल्याने घाटरस्त्यांचे तातडीने दुरुस्तीचे निर्देशही त्यांनी दिले. "शासन निर्णयानुसार सध्या १० जूनपर्यंतच मोफत रेती वितरणाची परवानगी आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेत रेती मिळण्यासाठी मदत व मार्गदर्शन आवश्यक आहे. पालकमंत्री असताना पात्र लाभार्थ्यांना रमाई व शबरी योजनांतर्गत मागेल त्याला घरे देण्यात आली होती. तसेच ओबीसी घटकांसाठी ‘नमो घरकुल’ योजना सुरू करण्यात आली. या सर्व योजनांचा खरा लाभ गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी मोफत रेती वाटप आवश्यक आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. घरकुल योजनेत ५० हजार रुपयांची वाढ शासनाने केल्याचेही त्यांनी नमूद केले. या योजनेची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे मागणी केली असल्याचेही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)