चंद्रपूरात 10 हजार वर्षांपूर्वीची महापाषाण युगातील सिंधू संस्कृती इतकाच खडककलेचा पुरातन ठेवा सापडला (A 10,000-year-old rock art artifact as old as the Indus Valley Civilization was discovered in Chandrapur.)
चंद्रपूर :- विदर्भाच्या दक्षिणेकडील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावात ही चित्रे आढळून आली आहेत. येथील सुमारे ६० ते ७० दगडांवर विविध रेषात्मक आकृती कोरलेल्या स्थितीत सापडल्या आहेत. या कोरीव आकृतींना "पेट्रोग्लिफ्स" म्हटले जाते. इतिहास अभ्यासक अरुण झगडकर यांनी या शोधाबाबत माहिती दिली आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील हा प्राचीन खडककलेचा ठेवा सिंधू संस्कृतीइतकाच पुरातन असल्याचा दावा केला आहे. सापडलेल्या खडकचित्रांमध्ये सरळ, आडव्या आणि तिरक्या रेषांनी बनवलेल्या आकृत्या दिसून येतात. काही ठिकाणी चौकोन, त्रिकोण आणि क्रॉससदृश रचना सुद्धा पाहायला मिळतात. झगडकर यांच्या मते, हे आकृतिबंध दगडावर टोकदार वस्तूने ठोकून किंवा घासून तयार केले गेले असावेत. या शैलीतून चित्रे कोरण्याची पारंपरिक आणि आदिम मानवांची पद्धत लक्षात येते. ही चित्रे अत्यंत प्राचीन असून, त्यांचा थेट संबंध मौर्य कालाच्या पूर्वीच्या मानवाच्या जीवनपद्धतीशी जोडता येतो, असे अभ्यासकांचे मत आहे
या चित्रांमध्ये स्पष्ट मानव, प्राणी किंवा देवतांची रूपे नाहीत, मात्र आकृतिबंधांकडे पाहता त्यांचा उपयोग संकेतचिन्ह, दिशा दर्शवणारे नकाशे किंवा धार्मिक प्रतीक म्हणून झाला असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकांनी येथे एका मोठ्या दगडाला शेंदूर लावून पूजास्थळ बनवले आहे. नवस फेडण्याची प्रथा या ठिकाणी आहे, त्यामुळे खडककला आणि लोकपरंपरेचा अनोखा संगम येथे दिसून येतो. भीमबेटका व रत्नागिरीशी चंद्रपूर जिल्ह्यात सापडलेल्या चित्रांचे साम्य रत्नागिरीमधील पेट्रोग्लिफ्स तसेच मध्य भारतातील प्रसिद्ध भीमबेटका येथील भित्तिचित्रांशी पाहायला मिळते. काही विद्वानांच्या मते, ही चित्रे ४,००० ते १०,००० वर्षे जुनी असू शकतात. विदर्भात गोंड आणि कोरकू या आदिवासी जमातींची संस्कृती निसर्गपूजेशी जोडलेली आहे. वृक्ष, खडक व नद्यांना पवित्र मानण्याची परंपरा त्यांच्यात आढळते. या पार्श्वभूमीवर खडकचित्रांचा संबंध आदिवासी प्रतीकात्मक संवाद प्रणालीशी जोडता येतो. हा ऐतिहासिक शोध केवळ विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा आहे. आदिमानवाच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकणाऱ्या या खडकचित्रांचा अभ्यास करणे ही पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून मोठी संधी ठरू शकते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या