महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर झरपट नदी परिसर स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर, आ. श्री. मुनगंटीवार यांच्या सक्रिय पुढाकाराने 2 कोटी 90 लक्ष रुपयांचा निधी मंजूर, आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नदीची पाहणी करून प्रशासनाला दिले होते निर्देश (In the background of the Mahakali Yatra, the work of cleaning the Zharpat river area is in progress. Mr. Mungantiwar's active initiative approved a fund of Rs. 2 crore 90 lakhs, MLA Shri. Sudhir Mungantiwar inspected the river and gave instructions to the administration)

Vidyanshnewslive
By -
0
महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर झरपट नदी परिसर स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर, आ. श्री. मुनगंटीवार यांच्या सक्रिय पुढाकाराने 2 कोटी 90 लक्ष रुपयांचा निधी मंजूर, आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नदीची पाहणी करून प्रशासनाला दिले होते निर्देश (In the background of the Mahakali Yatra, the work of cleaning the Zharpat river area is in progress. Mr. Mungantiwar's active initiative approved a fund of Rs. 2 crore 90 lakhs, MLA Shri. Sudhir Mungantiwar inspected the river and gave instructions to the administration)

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील ऐतिहासिक श्री माता महाकाली मंदिराच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर झरपट नदी परिसराच्या स्वच्छतेचे काम प्रगतीपथावर आहे. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः नदीची पाहणी करून संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले होते. त्यांच्या पुढाकाराने या कामांना गती मिळाली असून, यात्रेकरूंसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 2 कोटी 90 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील महाकाली यात्रा 3 एप्रिलपासून सुरू होत आहे. या यात्रेला महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, मराठवाडा आणि इतर राज्यांतून लाखो भाविक येतात. यात्रेकरूंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन 2 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. यासंदर्भातील शासनादेश दि.11 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रपूर शहरातील पायाभूत सोयीसुविधांसाठी विशेष तरतूद करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे  झरपट नदीचे पावित्र्य राखण्यासाठी आ. श्री. मुनगंटीवार यांचा पुढाकार चंद्रपुरातील महाकाली यात्रा ३ एप्रिलपासून सुरू होत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर पवित्र तीर्थ म्हणून झरपट नदीचे महत्त्व आहे. परंतु सध्या तिची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक आहे, याकडे नागरिकांच्या मागणीनुसार आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले आणि त्यासंदर्भात तातडीने काम करण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी संबंधित यंत्रणेला दिले होते. झरपट नदीचे पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाला गती महाकाली यात्रेदरम्यान झरपट नदीचे पावित्र्य जपणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने तिचे खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी संबंधित विभागांना दिले होते. 


            या अंतर्गत जलपर्णी वनस्पतींची साफसफाई, नदीपात्रातील घाण काढणे तसेच नदीचे स्वच्छ पाणी वाहते ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातून जलपर्णी वनस्पतींची साफसफाई करण्यासाठी जेसीबी आणि पोकलँड मशीन वापरण्यात येत आहे. भाविकांसाठी सोयीसुविधा सुधारण्याचे प्रयत्न महाकाली यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्नानगृह, चार ट्युबवेल्स, सीसीटीव्ही यंत्रणा, शौचालये, वाहनतळ, रोषणाई, तसेच अन्य आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. झरपट नदी परिसरात बंधाऱ्याचे काम, गेट दुरुस्ती, गायमुख दुरुस्ती, तसेच अंचलेश्वर मंदिर परिसरात टाइल्स बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच निरी (NEERI) संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून पाण्याची पाहणी सुरू असून, वेकोलीच्या माध्यमातून पंपिंगचे पाणी नदीत सोडण्याचे कामही सुरू आहे. नदी परिसरातील झाडे-झुडपे काढण्याचे आणि जागा समतल करण्याचे काम सुरू आहे. भाविकांना दिलासा, नागरिकांतून समाधान व्यक्त महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या स्वच्छता आणि सुविधा विकास कामांमुळे लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने झरपट नदीच्या पुनरुज्जीवनाला गती मिळाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. चंद्रपूर भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे व पदाधिकाऱ्यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे झरपट नदीचे सौंदर्यीकरण, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात निवेदनातून मागणी केली होती. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी त्याची दखल घेत पाठपुरावा केला होता. कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे आ. मुनगंटीवार यांनी स्वतः झरपट नदीची पाहणी केली. प्राथमिक टप्प्यामध्ये नदी परिसरातील जलपर्णी वनस्पती काढुन नदीपात्रातील साफसफाई व स्वच्छता करावी. नदीपात्रात येणारे सांडपाणी बंद करावे. 31 मार्चपर्यंत नदीचं पात्र स्वच्छ पाण्याने वाहते करावे. योग्य ठिकाणी गट्टू बसवावे. दोन टप्प्यांमध्ये काम करावे. सर्वप्रथम पहिल्या टप्प्यातील कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या. यासोबतच निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल असा शब्दही दिला होता. यात्रेच्या दरम्यान भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. यात्रेकरूंसाठी आवश्यक सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून दिल्या जातील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)