जिल्हा ग्रंथालय येथे प्रस्तावित आधुनिक अभ्यासिकेच्या कामाचा आढावा, शहराच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अभ्यासिकेला मॉडेल म्हणून विकसित करा - आ. किशोर जोरगेवार (A review of the work of the proposed modern textbook at the District Library, develop the textbook as a model for the educational progress of the city - MLA. Kishore Jorgewar)

Vidyanshnewslive
By -
0
जिल्हा ग्रंथालय येथे प्रस्तावित आधुनिक अभ्यासिकेच्या कामाचा आढावा, शहराच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अभ्यासिकेला मॉडेल म्हणून विकसित करा - आ. किशोर जोरगेवार (A review of the work of the proposed modern textbook at the District Library, develop the textbook as a model for the educational progress of the city - MLA. Kishore Jorgewar)


चंद्रपूर :- खनिज विकास निधीतून जिल्हा ग्रंथालय येथे तयार होत असलेली आधुनिक अभ्यासिका फक्त एका इमारतीपुरती मर्यादित न राहता चंद्रपूर शहराच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक बनली पाहिजे. ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जनाचे शक्तिशाली माध्यम बनावी असे नियोजन करत शहराच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या अभ्यासिकेला मॉडेल म्हणून विकसित करा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. खनिज विकास निधीतून मंजूर झालेल्या 15 कोटी रुपयांच्या जिल्हा ग्रंथालय येथे उभारल्या जात असलेल्या आधुनिक अभ्यासिकेच्या कामात येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहेत. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांगडे, उपविभागीय अभियंता विवेक अंकुले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नलावडे, कार्यकारी अभियंता पगारे, उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, सलीम शेख, रुपेश पांडे, कुमार जुनमुलवार, संजय महाकालीवार आदींची उपस्थिती होती. सदर बैठकीत कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला, तसेच अडचणींवर चर्चा करत आवश्यक सुधारणा आणि उपाययोजना सुचवण्यात आल्या. बांधकामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष द्यावे, विद्युत व जलव्यवस्थापनाची योग्य तयारी करावी आणि अभ्यासिकेच्या सुविधांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करावा. सदर अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम असून, त्यामध्ये वाचन, स्पर्धा परीक्षांची तयारी, डिजिटल शिक्षण आणि ग्रंथसंपदेचा उत्तम उपयोग यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सुविधा-संपन्न अभ्यासिकेचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रंथालय प्रशासनाने नियमित समन्वय साधत अडचणी दूर कराव्यात ही अभ्यासिका केवळ एक इमारत नसून, विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसाधनेचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची पूर्तता वेळेत आणि उत्कृष्ट दर्जात व्हावी, सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकामाच्या गुणवत्तेवर विशेष भर द्यावा. विद्यार्थी येथे दिवसरात्र अभ्यास करतील, त्यामुळे सुविधाजनक बैठक व्यवस्था, चांगला वाय-फाय, योग्य वायुवीजन आणि प्रकाशव्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. विद्युत आणि जलव्यवस्थापनाच्या अडचणी त्वरित सोडवल्या जाव्यात, विद्यार्थ्यांसाठी केवळ पारंपरिक वाचनालय न राहता डिजिटल अभ्यासिकेची संकल्पना राबवावी. त्यामुळे येथे ई-लायब्ररी, ऑनलाइन अभ्यास साहित्य, आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक डिजिटल साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. ही अभ्यासिका केवळ बांधून थांबण्याचा प्रकल्प नाही, तर सुरक्षित आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही, प्रवेश नियंत्रित व्यवस्था आणि स्वच्छता यावर विशेष भर द्यावा. अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)