जिल्हाधिका-यांकडून मुल येथील निवडणूक व्यवस्थेची पाहणी, स्ट्राँग रुम व चांदापूर फाटावरील निगराणी पथकाला भेट (Inspection of the election system at Mul by the District Collector, visit to the strong room and monitoring team at Chandapur Phata.)

Vidyanshnewslive
By -
0
जिल्हाधिका-यांकडून मुल येथील निवडणूक व्यवस्थेची पाहणी, स्ट्राँग रुम व चांदापूर फाटावरील निगराणी पथकाला भेट (Inspection of the election system at Mul by the District Collector, visit to the strong room and monitoring team at Chandapur Phata.)
चंद्रपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून जिल्हा प्रशासनाने सर्वत्र निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शनिवारी मूल येथील स्ट्राँग रुम तसेच गडचिरोली सीमेवर असलेल्या चांदापूर फाटारील स्थायी निगराणी पथकाला (एस.एस.टी) भेट दिली. 13-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणुकीसंदर्भात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या मुल येथील उपविभागीय कार्यालयातील स्ट्राँग रुमची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी मुलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार मृदूला मोरे (मुल), प्रियदर्शनी बोरकर (बल्लारपूर), मुलचे उपविभागीय पोलिस अधिकारी एस. एस. भगत, पोलिस निरीक्षक सुमीत परतेकी व इतर अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, अंतर्गत भागात वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या मतदान केंद्राची यादी तयार करून या केंद्रावरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांना वन्यप्राण्यांकडून कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशा मतदान केंद्राबाबत वन विभागाशी समन्वय साधून 18 आणि 19 एप्रिल या दोन दिवशी वन विभागाचा कर्मचारी तैनात ठेवावा. सोबत पोलिसांचेही सहकार्य घ्यावे. लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असून चंद्रपूर येथून या मार्गाद्वारे गडचिरोलीत दारु वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पोलिस विभागाने चोख बंदोबस्त ठेवून कारवाई करावी.
        पुढे ते म्हणाले, निवडणुकीच्या कामात ड्युटी लावण्यात आलेल्या अधिकारी – कर्मचा-यांचे मतदान कोणत्या क्षेत्रात येते, याबाबत माहिती अपडेट ठेवा. पोस्टल बॅलेट संदर्भात त्यांच्याकडून अर्ज भरून घ्यावा. पोलिस विभागालासुध्दा अशा प्रशिक्षणावेळी आमंत्रित करावे, जेणेकरून मतदानाच्या दिवशी किंवा इतर वेळी कायदा - सुव्यवस्थेसंदर्भात काही अडचणी निर्माण झाल्या तर, त्याचे वेळीच निराकरण व्हावे. मतदान प्रक्रियेदरम्यान नियुक्त करण्यात आलेल्या सेक्टर अधिका-यांसुध्दा वेळेवर उद्भवणा-या अडचणीवर मात करण्याबाबत प्रशिक्षण द्यावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. स्ट्राँग रुम व स्थायी निगराणी पथकाची पाहणी यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मुल उपविभागीय अधिकारी कार्यालयातील स्ट्राँग रुम, साहित्य पुरवठा कक्ष, आदर्श आचारसंहिता व तक्रार निवारण कक्ष, परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही आदींची पाहणी केली. तसेच चामोर्शी - गोंडपिपरी - सावली मार्गावर चांदापूर फाटा येथे स्थापन करण्यात आलेल्या स्थायी निगराणी पथकाला भेट देऊन अधिकारी - कर्मचाऱ्याची उपस्थिती तपासली व सुचना दिल्या.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)