लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत असतांना चंद्रपूरातील राजकीय पक्षांमध्ये उफाळून आलेली गटबाजी कुणाच्या पथ्यावर पडणार? (As the fever of the Lok Sabha elections is rising, the factionalism that has erupted among the political parties in Chandrapur will fall on whose path?)

Vidyanshnewslive
By -
0

लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत असतांना चंद्रपूरातील राजकीय पक्षांमध्ये उफाळून आलेली गटबाजी कुणाच्या पथ्यावर पडणार? (As the fever of the Lok Sabha elections is rising, the factionalism that has erupted among the political parties in Chandrapur will fall on whose path?)

वृत्तसेवा :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात उघड तर भाजपमध्ये छुपी गटबाजी पहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर समर्थक, अशी दुफळी निर्माण झाली आहे, तर भाजप उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सर्वत्र दिसत असले तरी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर कुठे आहेत, असा प्रश्न कार्यकर्त्यां सह मतदारांना पडला आहे. काँग्रेस पक्ष अजूनही पक्षीय राजकारणात गुंतला असल्याचे चित्र आहे. धानोरकर यांनी त्यांच्या पतीच्या मृत्यूला पक्षातील काही नेतेच कारणीभूत असल्याचे वक्तव्य करून तसेच कुणबी समाजाच्या नावाने वडेट्टीवार यांचा विरोध करणारे व धानोरकर यांचे समर्थन करणारे पत्रक काढून गटबाजीला खतपाणी घातले. दुसरीकडे, गेल्या दोन दिवसांत वडेट्टीवार समर्थकांनी दोन पत्रपरिषद घेत गटबाजीचे दर्शन घडविले. त्यामुळे काँग्रेस पक्षात जितके नेते तितके गट, अशी स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षात दोन मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना अनुकुल आहे, तर दुसरा आमदार प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, या मताचा आहे. दिवं. बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे नैसर्गिक न्यायाप्रमाणे पत्नी म्हणून मला उमेदवारी द्यावी, अशी धानोरकर यांची मागणी आहे. त्याला जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे व काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचेही समर्थन आहे, तर नैसर्गिक न्याय हा पोट निवडणुकीत लागू होतो. यामुळे प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार किंवा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना उमेदवारी द्यावी, अशी बाजू मांडणारा त्यांचा समर्थक वर्ग आहे. जाती-धर्माचे राजकारण न करता पक्ष ज्याला तिकीट देईल त्याचा प्रचार करू, असाही एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. मात्र, या संपूर्ण गोंधळात काँग्रेस पक्षातील गटबाजी उघडपणे समोर आली आहे. भाजपमध्येही छुपी गटबाजी पहायला मिळत आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने चंद्रपूर लोकसभेसाठी वनमंत्री मुनगंटीवार यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे भाजप तसेच मित्र पक्षातील अनेकांच्या पोटात दु:खणे उमळले. मुनगंटीवार यांच्या पहिल्याच आशीर्वाद सभेला हंसराज अहीर गैरहजर होते. अहीर दिल्लीत होते, असे समर्थक सांगत असले तरी उमेदवारी १३ मार्च रोजी जाहीर झाली. आज अकरा दिवस झाले असूनही भाजपच्या मंचावर किंवा प्रचारसभेत व बैठकीत अहीर व त्यांचे समर्थक कुठेही दिसले नाहीत. केवळ अहीरच नाही तर माजी मंत्री शोभा फडणवीस आणि जिल्ह्यातील भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार रॅली तसेच प्रचार सभांपासून लांब असल्याचे दिसून आले. याचा अर्थ काय समजायचा? भाजपचे नेते उघड गटबाजीचे दर्शन घडवत नसले तरी छुप्या पद्धतीने मत व मनभेद चव्हाट्यावर आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)