ऐतिहासिक संदर्भ समजून घेताना, तथागत गौतम बुद्धांचे भिक्षापात्र...! (Understanding the historical context, Tathagata Gautama Buddha's alms bowl...!)

Vidyanshnewslive
By -
0

ऐतिहासिक संदर्भ समजून घेताना, तथागत गौतम बुद्धांचे भिक्षापात्र...! (Understanding the historical context, Tathagata Gautama Buddha's alms bowl...!)

वृत्तसेवा :- थेरवाद परंपरेत बुद्धांना धम्मकाया (प्रतिकांच्या) स्वरूपात पुजले जात होते. बुद्धांचा सिंहनाद (धम्मचक्र प्रवर्तन ) निनादल्यापासून बुद्धांची मूर्ती मानवीय स्वरूपात प्रत्यक्षात येईपर्यंत सुमारे ५०० ते ५५० वर्षांचा काळ लोटला. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर  प्रत्यक्ष प्रतिमेच्या स्वरूपापेक्षा बुद्धांचे प्रतिनिधीत्व दर्शविण्यासाठी प्रतीकांचा शोध सुरू झाला.साहजिकच बुद्धांच्या जीवनाशी संबंधित वस्तू अथवा घटनांचे स्मरण देणाऱ्या वस्तू प्रतीके म्हणून स्वीकारली गेली. यांमध्ये स्तूप, पांढरा हत्ती, कमळ, घोडा, बोधिवृक्ष, गंधकुटी, वज्रासन, धम्मचक्र, बुद्धपाद (पदचिन्ह) व त्रिरत्न ई. होय. तर वरील सर्व धम्मकाया प्रतीकांपैकी तथागथांचे भिक्षापात्र याविषयी माहिती जाणून घेऊया. आजच्या बिहार राज्यातील गंगा नदीच्या उत्तरेस वसाढ नावाचे खेडे म्हणजेच प्राचीन काळाची राजनगरी वैशाली होय.सध्याचे बिहारमधील वसाढ हेच प्राचीन काळातील वैशाली हे भारतीय पुरातत्व शास्त्राचे जनक अलेक्झांडर कनिंगहम यांनी प्रथमतः सर्वांसमक्ष आणले. तथागतांच्या हयातीत वैशालीस लिच्छवी राजघराणे राज्य करत होते. वैशाली सोडताना परिनिर्वाणाचा काळ जवळ आल्याने आपण एकटे असावे असे तथागतांना वाटले. त्याचप्रमाणे, वैशालीच्या लिच्छवीना बुद्धांचा जास्तीत जास्त सहवास मिळावा या हेतूने वैशालीचा निरोप घेताना ते बुद्धांच्या मागे बरेच अंतर चालून गेले. आपल्याविषयी असलेल्या आदरयुक्त भावनेच्या जाणिवेपोटी तथागतांनी आपले भिक्षापात्र लिच्छवीना भेट म्हणून दिले.ते भिक्षापात्र  लिच्छवीनीं प्राणपणाने जपून ठेवले. वैशालीजवळ एका स्तंभावर ही सत्यकथा लिहून ठेवली आहे, असे वर्णन फाह्यान याने आपल्या प्रवासवर्णनात A Record of Buddhist Kingdoms (Foguo Ji)  प्रवासवर्णनात लिहून ठेवली आहे.

        चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या काळात बुद्धधातू अवशेषांचे लहान लहान भाग करून ते कुपीत भरून सर्व जम्बुद्विपात ८४००० स्तूप उभारले. पण बुद्धांच्या भिक्षापात्रचे त्या धातू अवशेषांबरोबर भाग केल्याचे कोठेही नोंद नाही. तथागतांच्या महापरिनर्वाणानंतर त्यांचे भिक्षापात्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. बुद्धांचे भिक्षापात्र कशाचे बनले होते याचा उल्लेख कुठे मिळत नसला तरीही बुद्धांची साधी राहणी लक्षात घेता ते मातीचे अथवा दगडाचे असावे. याला दुजोरा देण्यासाठी सोपारा स्तूपाच्या उत्त्खननातून भेटलेल्या भिक्षापात्राचे अवशेषांची मदत होते. सोपारा हे सम्राट अशोकांच्या प्रांतिक राजधानीचे ठिकाण होते. याच सोपाऱ्यात सम्राट अशोकाच्या आठव्या व नवव्या राजाज्ञा सापडल्या. इ.स. १८८२ मध्ये, पंडित भगवनलाल इंद्रजी यांनी तत्कालीन ठाण्याचे कलेक्टर म्युलॉक यांच्या मदतीने सोपारा स्तूपाचे उत्खनन केले. उत्खननात सोपारा येथे ८२ मीटर परिघाचा उत्कृष्ट मातीच्या विटांनी बांधलेला स्तूप आढळून आला. सोपारा स्तुपाच्या मध्यभागी एक दगडी करंडक आढळून आला. त्या दगडी करंडकात एक तांब्याचा करंडक होता. त्यात सात मानुषी बुद्धांच्या व एक मैत्रेय बोधिसत्वाची मूर्ती होती. तांब्याच्या करंडकाच्या आत एक चांदीचा करंडक होता. त्यात काही सुवर्णफुले व रत्ने होती. तांब्याच्या करंडकात तांब्याच्या पत्रावर बुद्धांचा छाप व चांदीचे नाणे होते. ते यज्ञश्री सातकर्णी चे नाणे होय. चांदीच्या करंडकात संगमरवरी, त्यात स्फटिक त्यात सुवर्ण करंडक असे विविध सुवर्ण फुले व रत्नाने भरपूर असे करंडक होते. यापैकी, सुवर्णाच्या करंडकात मातीच्या भिक्षापात्राचे लहान तुकडे आणि त्या भिक्षापात्राला अर्पण केलेली दहा सुवर्ण फुले, एक हिरा, एक पाचू होता. सिद्धार्थ गौतमास बुद्धत्व प्राप्त झाल्यापासून, सम्यक संबुद्धांच्या महापरिनिर्वाणापर्यंत पंचेचाळीस वर्षाच्या कालखंडात तथागतांनी एकच भिक्षापात्र वापरले असणे शक्य नाही. त्या काळात त्यांनी वापरलेल्या अनेक भिक्षापात्रांपैकी कोना एकाचे अवशेष सोपारा स्तुपात जतन करून ठेवले असण्याची शक्यता आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे तथागतांच्या महापरिनर्वाणानंतर त्यांचे भिक्षापात्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते त्याचेच शिल्पांकन खालील चित्रात दर्शविले आहे. हे शिल्पाचे अंकन अमरावती स्तूपावर केलेले असून सद्यस्थितीत हे शिल्प गव्हर्नमेंट म्युझियम, चेन्नई येथे सुरक्षित आहे.

संदर्भ :- भारताचे संस्कृतिवैभव - डॉ. शोभना गोखले.

मराठवाड्याचा सांस्कृतिक इतिहास - डॉ. गौतम पाटील, डॉ. अनिल कठारे.

महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास - मा. श. मोरे

अतिथी मार्गदर्शक :- रोहित राजेंद भोसले 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज ), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)