शांततेचे नोबेल हिसकावून घेणार्या ट्रम्प यांनी जगाला युद्धभूमी करून टाकले
वृत्तसेवा :- माकडांच्या हाती कोलीत दिल्यावर आणखी वेगळे काय होणार आहे? इथे तर आपण माकडांना सर्वशक्तिमान करून टाकले आहे. मग त्यांनी जग पेटवले तर दोष द्यायचा तरी कोणाला? या होळीत सारेच भस्मसात होऊ लागले आहे. स्वतःला ‘शांततादूत’ मानणार्या डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला युद्धाचे चटके द्यायला सुरूवात केली आहे. अमेरिका ठरवते ती लोकशाही आणि अमेरिकेला वाटते तो दहशतवाद, याच न्यायाने अमेरिकेची फौजदारकी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ‘हे युद्ध मी थांबवले, ते युद्ध थांबवले’ म्हणून शांततेचे नोबेल हिसकावून घेणार्या ट्रम्प यांनी जगाला युद्धभूमी करून टाकले आहे. माय फ्रेंड डोलांड एकटे नाहीत. त्यांच्या जोडीला तेवढेच युद्धखोर असलेले बेंजामिन नेत्यानाहू आहेत. तेच आपले फादरलॅंडवाले! या जोडीने खामेनेईंचा खात्मा केला असे मान्य केले, तरी त्यामुळे युद्ध संपणार नाही. खामेनेई हेही ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्याच जातकुळीचे. सर्वसामान्य माणसांच्या अहिंसक भावनेला न जुमानणारे. लोकशाही कशाशी खातात, हे माहीत नसणारे. धर्मांध आणि प्रतिगामी. बुडाला खामेनेई पापी, याचे दुःख नाहीच! पण, हिंसाचार हे कशावरचे उत्तर नाही. एखाद्या देशातील जुलमी राजवट उलथून टाकणे हे त्या देशातील नागरिकांचे काम आहे. त्या देशावर कोणी असे भयंकर आक्रमण करणे आणि तिथली निरपराध माणसे मारणे हा त्यावरचा मार्ग नाही.
इराणच्या अणुकार्यक्रमावरून चर्चा फिस्कटल्यानंतर इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर आक्रमण केले. या आक्रमणात त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह अली खामेनेई यांच्या अधिकृत कार्यालयावर हल्ले केले. अमेरिकेचे खरे लक्ष्य खामेनेईच होते. त्यांना सत्तेवरून हटवून ‘लोकशाही’ सरकार आणण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत. १९८९ पासून इराणच्या राजकारणावर आणि धार्मिक नेतृत्वावर प्रभावी नियंत्रण ठेवणाऱ्या खामेनेई यांनी इस्लामिक रिपब्लिकची दिशा ठरवली, रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या बळावर अंतर्गत विरोध दाबला आणि परराष्ट्र धोरणात अमेरिकाविरोधी आणि इस्रायलविरोधी भूमिका ठाम ठेवली. त्यांच्या नेतृत्वाखाली इराणने आपला अणुकार्यक्रम पुढे नेला. प्रादेशिक पातळीवर वेगवेगळ्या प्रॉक्सी गटांना पाठबळ दिले आणि लेबनॉन, सीरिया, इराक, येमेन या पट्ट्यात प्रभाव वाढवला. खामेनेई अमेरिकेला इराणचा क्रमांक एकचा शत्रू असे म्हणत. त्यानंतर इस्रायलचा क्रमांक लागतो, असेही ते वारंवार म्हणत आले. इराण कधीही अण्वस्त्र तयार करणार नाही आणि त्यांचा आण्विक कार्यक्रम केवळ नागरी उद्देशांसाठी आहे, असे खामेनेई सातत्याने सांगत. खामेनेई यांच्या मृत्यूच्या बातमीचा संबंध थेट इस्रायली कारवाईशी जोडला गेला, तर त्याचे परिणाम दूरगामी ठरू शकतात. इस्रायलसाठी हा धोरणात्मक विजय मानला जाऊ शकतो. मात्र, इराणमध्ये सर्वोच्च नेता हा केवळ राजकीय पदाधिकारी नसतो; तो ‘विलायत-ए-फकीह’ या तत्त्वाचा प्रतीक असतो. त्यामुळे मृत्यूची बातमी इराणी समाजात संतापाची लाट निर्माण करू शकते, ज्याचा परिणाम थेट इस्रायलविरोधी प्रतिहल्ल्यांत, क्षेपणास्त्रवर्षावात किंवा प्रादेशिक सहयोगी गटांच्या सक्रियतेत दिसू शकतो. हिझबुल्ला, हमास किंवा इराणसमर्थक मिलिशिया यांची हालचाल वाढल्यास हा संघर्ष मर्यादित न राहता व्यापक युद्ध सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शीतयुद्धानंतरचे जग बहुध्रुवीय झाले आहे. मात्र, अमेरिकेला ते आपल्या ताब्यात घ्यायचे आहे. तंत्रज्ञान, सायबरयुद्ध, ड्रोन आणि प्रॉक्सी लढाया यामुळे युद्धाचे स्वरूप आता बदलले आहे. अशा वेळी एका सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूने संघर्ष अधिकच अनिश्चिततेकडे गेला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या या ‘पोस्टट्रूथ’ युगात अफवा, खोटे दावे आणि प्रचारयुद्ध हे सारेच असते. त्यामुळे कोणतीही बातमी स्वीकारताना सावधगिरी आवश्यक आहे. मुद्दा तेवढाच नाही. खामेनेई हुकुमशहा होते, हे खरे आहे. मात्र, लोकशाहीच्या बाता ट्रम्प आणि नेत्यानाहू यांनी माराव्यात, यासारखा मोठा विनोद नाही. तेल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील मालकीसाठी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हल्ला केला आहे. ट्रम्प यांना आंतरराष्ट्रीय तेल बाजार आपल्या तालावर नाचवायचा आहे. त्या लॉबीला खुश करण्यासाठी ट्रम्प व्हेनेझुएलानंतर इराणवर बरसले आहेत. पण, अमेरिकेसोबत रशिया वा चीन नाही. युरोपही नाही. त्यामुळे जग विभागले गेले आहे. दोन्ही बाजूंकडे तेवढेच सामर्थ्य आहे. इराण काही सामान्य नाही. तो इस्रायलपेक्षाही शक्तिमान आहे. ही स्थिती वाटते तेवढी सोपी नाही. अमेरिकेसारख्या महासत्तेमुळे प्रादेशिक युद्धाचे जागतिकीकरण झाले. थेट युद्ध पेटले तर पर्शियन आखातातील तेलवाहतूक धोक्यात येईल, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव वाढेल आणि जागतिक तेलदर उसळी घेईल. त्याचा परिणाम भारतासारख्या देशांवर थेट होईल. रुपयाचे अवमूल्यन, महागाईचा दबाव आणि शेअरबाजारातील अस्थिरता हे त्याचे आर्थिक परिणाम असू शकतात. हा तणाव तीव्र झाल्यास जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवरच मोठा परिणाम होईल. हे झाले तात्कालिक. मात्र, युद्ध आणखी भडकले तर काहीही घडू शकते! हिंसेला प्रत्युत्तर हिंसेने दिले, तर त्याला अंत नाही. मध्यपूर्वेने अनेक दशके युद्ध, प्रतिहल्ले, निर्बंध आणि अस्थिरता अनुभवली आहे. सामान्य नागरिक सतत अस्वस्थतेत जगत आहेत. युद्धाच्या ज्वाळांमध्ये राजकीय गणिते बदलतात; परंतु शेवटी प्रश्न एकच उरतोः या संघर्षातून मानवी समुदायाला काय मिळाले? उत्तर केवळ विध्वंस हेच असेल, तर इतिहास पुन्हा त्याच चुकांची पुनरावृत्ती करेल. माकडांच्या हातात कोलीत दिल्याची किंमत आपल्यालाही कधीतरी चुकवावी लागेलच!
संकलन :- संजय आवटे
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या