चंद्रपूर : "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे ही केवळ वर्तमानपत्र नसून तो एक विचार आणि संघर्ष आहे. आजच्या काळात प्रस्थापित मीडिया बहुजन समाजाच्या प्रश्नांकडे आणि यशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अशा परिस्थितीत समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी 'प्रबुद्ध भारत' सारखी आपल्या हक्काची माध्यमे टिकवणे आणि वाढवणे ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी केले. 'प्रबुद्ध भारत' पाक्षिकाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त बल्लारपूर येथे आयोजित वाचक मेळाव्यात त्या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन न्यायमूर्ती माता रमाई बहुद्देशीय संस्था, बल्लारपूर यांच्या वतीने करण्यात आले होते. आपल्या भाषणात प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले. त्या म्हणाल्या की, सागर शेजवळ, रोहित वेमुला, डॉ. पायल तडवी, नितीन आगे, अक्षय भालेराव, शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि अनुष्का पाटोळे यांसारख्या अनेकांची हत्या केवळ त्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले किंवा बाबासाहेबांचा विचार जपला म्हणून झाली. मात्र, प्रस्थापित मीडियाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येबाबत कधीही जाब विचारला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांचे उदाहरण देताना त्या म्हणाल्या, वंचित बहुजन आघाडीने निवडणुकांमध्ये शंभरच्या आसपास जागा जिंकल्या, तरीही मीडियाने त्याची दखल घेतली नाही. याउलट, ज्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही, त्यांना मोठी प्रसिद्धी दिली जाते. हा भेदभाव रोखण्यासाठी आपल्याला आपला विचार लोकांपर्यंत पोहचवावा लागेल.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशांत वाघ यांनी केले. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष नावाजी नगराळे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण कृष्णाजी करमतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी वाचन मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या दिशा पिंकी शेख, कुशल मेश्राम, प्रकाश नावाडे, किशोर तेलतुंबडे, स्नेहदीप खोब्रागडे, जयदीप खोब्रागडे, कविता गोरकार, कैविश मेश्राम आणि शालिनी वावरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माता रमाई बहुद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्याला चंद्रपूर जिल्ह्यातील 'प्रबुद्ध भारत'चे वाचक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या