बल्लारपूरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा (Republic Day was celebrated with enthusiasm in Ballarpur.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा (Republic Day was celebrated with enthusiasm in Ballarpur.)


बल्लारपूर :- भारतीय प्रजासत्ताकाच्या 77 व्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात बल्लारपूरात साजरा करण्यात आला या निमित्ताने मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 9:30 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडला यावेळी उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस विभागातर्फे सशस्त्र मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमास तहसीलदार रेणुका कोकाटे, नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले, नायब तहसीलदार अजय मल्लेलवार, निरीक्षण अधिकारी प्राजक्ता सोमलकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य, सेवानिवृत्त सैनिक तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


      यानंतर भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त बल्लारपूर नगर परिषद यांच्या वतीने सकाळी 10:00 वा ध्वजवंदन कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या प्रसंगी नगराध्यक्षा, नगर परिषद बल्लारपूर मा. डॉ. अल्का अनिल वाढई यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मूल्यांचा गौरव करण्यात आला. प्रजासत्ताक दिन हा भारतीय संविधान अंमलात आल्याचा गौरवशाली दिवस असून, लोकशाही, अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून देणारा महत्त्वाचा दिवस आहे. या दिनाच्या औचित्याने उपस्थित सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी रविंद्र भांडारवार, उपमुख्याधिकारी संगिता उमरे, कार्यालयीन अधीक्षक नंदू सातपुते, शहर समन्वयक मयुरी भोयर, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका तसेच विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. 


           बल्लारपूर शहरातील प्राचीन ऐतिहासिक किल्ल्यावर सकाळी 10:35 वाजता बल्लारपूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र सत्यदेव आर्य यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले यावेळी गोंड राजाचे वंशज वीरेंद्र महाराज यांच्यासह मुख्याधिकारी विशाल वाघ, सौ. अल्का वाढई नगराध्यक्ष बल्लारपूर यांच्यासह माजी नगराध्यक्ष, नगरसेवक अधिकारी व कर्मचारी, पोलीस दल, पत्रकार, शालेय विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती होती. बल्लारपूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गांधी चौक येथे काँग्रेस चे शहर अध्यक्ष अब्दुल करीम यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगर सेवक, सेविका उपस्थित होते. यासह बल्लारपूर शहरातील विविध राजकीय पक्षाच्या कार्यालयात (काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, आम आदमी पक्ष) प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यासोबतच अग्निशमन विभाग, पोलीस स्टेशन बल्लारपूर, ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, बल्लारपूर शहरातील विविध शाळा महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.


संपादक :- दिपक चरणदास भगत, विद्याश न्युज, मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)