काँग्रेसच्या अंतर्गत वादात व श्रेयवादाच्या लढाईत महापौर पद तर सुटणार नाही ?(Will the mayor's post be lost amidst the internal disputes and power struggles within the Congress party ?)
चंद्रपूर :- एकीकडे संपूर्ण राज्यात भाजपची व महायुती विजयी घोडदौड सुरु असतांना चंद्रपूर महानगरपालिकेत मात्र काँग्रेस पक्षाने मुसंडी मारत विजयाचा गुलाल उधळला. मात्र, हा आनंद फार काळ टिकतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या अंतर्गत असलेल्या धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार या दोन गटांतील वाद आता चव्हाट्यावर आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होत आहे याच संधीचा फायदा घेत भाजपने 'महापौरपदाची गुगली' टाकली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी वाटपात आपला शब्द प्रमाण मानल्याने आमदार विजय वडेट्टीवार समर्थकांचे पत्ते कट झाले होते. दुसरीकडे, भाजपमध्येही आमदार किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार समर्थकांमधील 'एबी फॉर्म' नाट्यामुळे अनागोंदी माजली होती. भाजपच्या या विखुरलेल्या फळीचा फायदा काँग्रेसला झाला आणि मतदारांनी काँग्रेसच्या झोळीत दान टाकले.
काँग्रेस बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली असली तरी सत्तेची चावी कुणाकडे राहणार, यावरून श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. धानोरकर गट आपली ताकद दाखवत असतानाच, वडेट्टीवारांनी आपली राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे एका गटाने 15 नगरसेवक तर एका गटाने 12 नगरसेवक आपल्या पाठीशी असल्याचा दावा केल्याची माहिती प्राप्त होत आहे. या नेत्यांच्या वादात विजयी नगरसेवक मात्र संभ्रमात असून, काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास अंतर्गत कलहामुळे हिरावला जाण्याची भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे. चंद्रपूर महापालिकेत सध्या तरी 'काँग्रेसची सत्ता, पण संकटात' असे चित्र आहे. काँग्रेसचे दोन्ही गट सामंजस्याने महापौर ठरवतात की भाजप या संधीचे सोने करून 'राजकीय चमत्कार' घडवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. चंद्रपूरच्या या 'राजकीय चाणक्यांच्या' खेळात अखेर बाजी कोण मारणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या