वंचित व ठाकरे सेनेच्या नवीन अधिकृत गट नोंदणी केल्याने ट्विस्ट, कुणासाठी दरवाजे उघडणार, वा कुणाची वाढणार डोकेदुखी ? (The registration of new official groups by Vanchit Bahujan Aghadi and the Thackeray faction has added a twist; for whom will doors open, and whose headaches will increase?)

Vidyanshnewslive
By -
0
वंचित व ठाकरे सेनेच्या नवीन अधिकृत गट नोंदणी केल्याने ट्विस्ट, कुणासाठी दरवाजे उघडणार, वा कुणाची वाढणार डोकेदुखी ? (The registration of new official groups by Vanchit Bahujan Aghadi and the Thackeray faction has added a twist; for whom will doors open, and whose headaches will increase?)

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून सत्ता स्थापनेचा पेच अधिक रंजक झाला आहे. शुक्रवारी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत आपल्या नवीन गटाची अधिकृत नोंदणी केली. या दोन्ही पक्षांच्या नव्या युतीमुळे आता चंद्रपूरच्या सत्तेच्या समीकरणाने मोठी कलाटणी घेतली असून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही मोठ्या पक्षांची धाकधूक वाढली आहे. जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल, त्यालाच आम्ही पाठिंबा देऊ, अशी थेट भूमिका ठाकरे गटाने घेतल्याने आता चंद्रपुरात कोण कोणासोबत जाणार, याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी चंद्रपुरात भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता. निवडणुकांचे निकाल लागल्यावर काँग्रेसमध्येही विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. मोठ्या पक्षांमधील अंतर्गत गटबाजीचा फायदा आता ठाकरे गट आणि वंचितची युती घेताना दिसत आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या म्हणीप्रमाणे, आता काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही डावलून ठाकरे गट आपला महापौर बसवणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
           शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी या नव्या युतीची घोषणा केली असून, आणखी 2 अपक्ष नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जर हे अपक्ष नगरसेवक सोबत आले, तर या गटाचे संख्याबळ 10 वर पोहोचणार आहे. यामुळे 66 सदस्य असलेल्या महानगरपालिकेत हा गट सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेत किंगमेकर ठरण्यासाठी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ठाकरे गटाचे 6 आणि वंचितचे 2 असे एकूण 8 नगरसेवक आता एकाच गटात आले आहेत. महानगरपालिकेत 30 जागांसह काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, मात्र बहुमतासाठी त्यांना अजून काही आकड्यांची गरज आहे. ठाकरे गटाने काँग्रेसकडे आपला प्रस्ताव पाठवला असून त्यांनी महापौरपदाची मागणी केली आहे. संदीप गिरे यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही काँग्रेसला आमची भूमिका कळवली आहे, पण जर काँग्रेसने आमचा प्रस्ताव स्वीकारला नाही, तर आमच्यासमोर भाजपसह इतर पर्याय खुले आहेत. जो पक्ष आम्हाला आदर देईल आणि महापौरपद देईल, आम्ही त्यांच्याच बाजूने उभे राहू, असा इशारा दिल्याने आता काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. चंद्रपूरच्या राजकारणात भाजप हा 23 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. सुरुवातीला महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गट काँग्रेससोबत जाईल अशी शक्यता होती, मात्र आता महापौरपदावरून निर्माण झालेला पेच भाजपच्या फायद्याचा ठरू शकतो. जर काँग्रेसने ठाकरे गटाची अट अमान्य केली, तर ठाकरे गट थेट भाजपशी हातमिळवणी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
             काँग्रेसमधील अंतर्गत वाद अखेर संपुष्टात आले आहेत. ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झालेल्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून संजीवनी वासेकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, आरक्षणापूर्वी चर्चेत नसलेले हे नाव अचानक पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महापौर पद ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर पक्षातील चार महिला नगरसेविकांची नावे आघाडीवर होती. यात माजी महापौर संगीता अमृतकर, सुनंदा धोबे, वनश्री मेश्राम आणि संजीवनी वासेकर यांचा समावेश होता. या सर्वच महिला नगरसेविका अनुभवी आणि पक्षात आपापले वजन राखून असल्याने निर्णय घेणे काँग्रेस नेतृत्वासाठी आव्हानात्मक ठरत होते. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर या दोघांनाही मान्य होईल, असा तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर दोन्ही नेत्यांना स्वीकारार्ह असलेले नाव म्हणून संजीवनी वासेकर यांची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रभाग क्रमांक १० एकोरी मधून विजयी झालेल्या संजीवनी वासेकर या नव्या चेहऱ्याला संधी देत काँग्रेसने सर्वांना धक्का दिला आहे. आरक्षणापूर्वी त्यांच्या नावाची कुठेही चर्चा नसताना, अचानक त्या महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर आल्याने राजकीय चर्चांना वेगळेच वळण मिळाले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)