मुंबईसह 19 महापालिकांची सत्ता काबीज करणाऱ्या भाजच्या विजयरथाला चंद्रपुरात ब्रेक काँग्रेस मित्रपक्षाच्या मदतीने सत्तेत (The BJP's victory march, which had captured power in 19 municipal corporations including Mumbai, was halted in Chandrapur; the Congress came to power with the help of its allies.)
BJP ला नेमका कशाचा बसला फटका?
चंद्रपूर :- महानगरपालिका निवडणुकीत राज्यभर भाजपची घौडदौड सुरू असताना, चंद्रपुरात मात्र काँग्रेसने भाजपचा विजयाचा अश्वमेध रोखण्यात यश मिळवले. भाजपमधील गटबाजी आणि काँग्रेसने नव्या उमेदवारांना संधी देण्याची घेतलेली जोखीम यशस्वी ठरली. परिणामी काँग्रेस बहुमताच्या काठावर पोहोचली व मित्रपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापण्यात यशस्वी होईल. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत 'पानिपत' झाल्यानंतरही भाजपने त्यातून धडा घेतल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत अनुकूल वातावरण असतानाही भाजपला त्याचा लाभ उचलता आला नाही. तिकीट वाटपापासूनच भाजप नेत्यांमधील अंतर्गत कलह उफाळून आला. प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेल्या यादीतील तब्बल १७ उमेदवार बदलण्यात आल्याने पक्षांतर्गत दुरावा आणखी वाढला. त्यामुळे पक्ष एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याचे चित्र उभे राहू शकले नाही.
आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वतंत्र उमेदवार असल्याचा संदेश मतदारांपर्यंत गेला. त्यामुळे शहरात भाजपच्या बाजूने अपेक्षित हवा तयार होऊ शकली नाही. परिणामी प्रत्येक प्रभागात वेगवेगळी लढत पाहायला मिळाली. सन २०१७ च्या निवडणुकीत शहराने भाजपला ३६ जागा देत स्पष्ट बहुमत बहाल केले होते. ती भाजपची आजवरची सर्वोच्च कामगिरी होती. मात्र यावेळी मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली. उमेदवार निवडीत झालेल्या चुकांचा, दोन प्रमुख नेत्यांमधील विसंवादाचा व गटबाजीचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे तब्बल १४ जागा गतवेळीपेक्षा कमी झाल्यात. भाजपने जवळपास सर्व प्रभागांत जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली, तर काँग्रेसने त्यांच्याविरोधात नवे चेहरे मैदानात उतरवले. त्याचा थेट फायदा काँग्रेसला झाला. काँग्रेस नेत्यांमध्येही अंतर्गत वाद होते, मात्र भाजपमधील संघर्ष अधिक ठळक असल्याने त्यांची फारशी चर्चा झाली नाही. मात्र भाजपाबाबतच्या नाराजीचा फायदा काँग्रेसला झाला व गतवेळेसपेक्षा तब्बल १९ जागा जास्त मिळवून ३१ जागांसह सत्तेच्या जवळ गेला आहे. हा आकडा बहुमताच्या आकड्यापेक्षा ४ ने कमी असला तरी मित्रपक्षांची सोबत घेऊन काँग्रेस सत्तेत सहजपणे काबीज होऊ शकते. मागच्यावेळी ८ जागा जिंकणाऱ्या बसपाला यावेळी मात्र एकाच जागेवर समाधान मानावे लागले. तर, एआयएमआयएमनेही एक जागा जिंकून चंद्रपूर मनपात पहिल्यांदाच प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडी नेही २ जागा जिंकत आपली उपस्थिती दर्शविली आहे. चंद्रपूरमधील पक्षनिहाय जागा एकूण जागा ६६, घोषित निकाल ६६, भाजप - २२, शिवसेना (शिंदे गट) - १, काँग्रेस - ३१, शिवसेना (उबाठा) - ६, एआयएमआयएम - १, बसपा - १, वंचित - २, अपक्ष - २
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या