पुरोगामी महाराष्ट्रात अघोषित आणीबाणीतील लेखन (Writing during the undeclared state of emergency in progressive Maharashtra.)

Vidyanshnewslive
By -
0
पुरोगामी महाराष्ट्रात अघोषित आणीबाणीतील लेखन (Writing during the undeclared state of emergency in progressive Maharashtra.)

वृत्तसेवा :- लेखकासाठी, कोणताही काळ कधीच पूर्णपणे अनुकूल किंवा प्रतिकूल नसतो. परिस्थिती, आणि काळ हा स्थिर नसतो. परिस्थिती सतत बदलत असते. आणि त्या बदलाला लेखकाने, कलावंताणें प्रतिसाद द्यायलाच हवा. हे खरे आहे की, आजचा काळ गोंधळ, भीती, दहशत, सांस्कृतिक उन्माद, ध्रुवीकरण चा काळ आहे. तरीही प्रतिकूल वातावरणात नवी संधी, शोधण्या साठी लेखका कडे काही दालन पण उपलब्ध आहेत..एकंदरीत काळ मिश्र स्वरूपाचा आहे. मी स्वतः लेखक म्हणून जे अनुभवतो, त्याचबरोबर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले विश्लेषण येथे मांडतांना. आजची सध्यास्तिथी परिस्थिती अतिशय विरोधाभासपूर्ण आहे. एका बाजूला सोशल मीडियासारखी व्यासपीठे अभिव्यक्तीसाठी मोकळीक देतात. संपादकांचा दबाव, दडपण, शब्दांची मर्यादा नसते. तर दुसरीकडे सोशल मीडिया च्या माध्यमातून व्यक्त झालेल्या मतांवरून बहिष्कार, ट्रोलिंग, काळे फासणे, घरावर हल्ले आणि धमक्या दिल्या जातात. त्यामुळे हा काळ अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही आहे.
           लेखकाची घुसमट लेखक म्हणून मला कधी कधी घुसमट जाणवते. लिहिताना प्रश्न पडतो – “हे वाचकाला पटेल का? माझ्या लेखणाला प्रचारकी साहित्य तर म्हणणार नाही. मी लिहलेलं साहित्य, कथा, कादंबरीला कुणीतरी विकृत करून मांडेल ” ही सतत ची भीती मनात नेहमीच असते. कारण अनेक लेखकांच्या चांगल्या कृतीला तोडून मोडून विकृत करून लोकांपुढं ठेवण्यात आल्याचे मी पाहिले आहे. तरीही हीच घुसमट नवे लेखनमार्ग शोधण्यास प्रवृत्त करते. दोन दशकभरापूर्वीचा मोकळेपणा पंधरा वीस वर्षांपूर्वी लिखाण अधिक सहजतेने होत असे. वाद निर्माण होण्याची भीती इतकी प्रकर्षाने नसे. आज मात्र प्रत्येक वाक्याचे विश्लेषण केल्या जाते पूर्वग्रह दूषित विचाराने ग्रस्त असलेले, एका विशिष्ट विचारांशी बांधिलकी जोपसणारे आणि समविचारी नसलेल्या लेखकांच्या लिखाणाचा तोडमोड करून राजकीय अर्थ लावल्या जातो. त्यामुळे लेखन स्वातंत्र्यावर बंधन असल्याचे जानवते. सद्यास्तिथ दोन दशका पूर्वीचा मोकळेपणा आज तरी मला जाणवत नाही. भीतीमुळे थांबलेले लेखन आज अनेक लेखक भीतीपोटी लिहितच नाहीत. काहींनी आपली जुनी पुस्तके परत घेतली आहे. किंवा भीतीपोटी त्यात काही फेरबदल केले आहे.काहींनी तर सोशल मीडियावरून सपशेल माघार घेतली आहे. बरेच लेखक चर्चेत सहभागी होत नसल्याचे दिसून येतात.आपले म्हणणे पूर्वीसारखे रोखठोक मांडतांना ही दिसत नाही.सध्यास्तीत लेखकांची परिस्थिती ही अत्यंत गुंतागुंतीची व आव्हानात्मक आहे. भीती, राजकीय,ध्रु्विकरण, धार्मिक कट्टरता, तुरुंगात खितपत ठेवणे, हा अनुभव पाहताना लेखकाच्या स्वातंत्र्याची खरी कसोटी जाणवते. खऱ्या अर्थाने लोकशाहीचे सौंदर्य असहमतीत आहे. सहमतीतून फक्त एकात्मता निर्माण होऊ शकते. पण खरी प्रगती तेव्हाच घडते जेव्हा भिन्न- भिन्न मतांना योग्य स्थान दिले पाहिजे. भिन्न विचारांच्या मतांचा,आदर केला पाहिजे. त्यामुळे माझ्या मते असहमती हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. " कला, साहित्य ही चेतना जागवते. फुले-आंबेडकरांच्या जणवादी विचाराने, लिखाणाने इथला समाज बदलला आहे. थेट क्रांती झाली नसली तरी ही लेखन, साहित्य, कला, सांस्कृतिक जत्ते नेहमीच नवं क्रांतीची बीजारोपणाचे काम करीत आले आहे.
           काळ प्रतिकूल असेल तर लेखकाने दस्तऐवजीकरण केले पाहिजे. समाजातील वेदना,व्यथा, अन्याय, असमानता, जातीयता विरोधात आपली मतं नोंदवली पाहिजे. काळ अनुकूल असेल तर प्रयोगशील आणि नवकल्पनापूर्ण साहित्य निर्माण करावे. दोन्ही परिस्थितीत लेखनाचे, लेखकांचे महत्त्व तितकेच राहते. असे मला वाटते. आज काही पुस्तके वाचकांकडून जाणीवपूर्वक बेदखल केली जाते.किंवा सत्ते कडून ती दाबली जात आहे. लेखक ही दहशतीच्या सावटा खाली आल्याचे दिसून येते. दक्षिणेतील लेखक पेरूमल मुरुगन यांनी धार्मिक दबावात येऊन आपले लेखन थांबविल्याचे सांगितले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आल्याने,भीतीपोटी आपले प्रकाशित झालेले पुस्तकं बाजारातून परत घेतली आहे.तसेच दिल्ली दंगल वर लिहणाऱ्या लेखिका मोनिका अरोरा तसेच सोनाली चिंतळकर व प्रेरणा मल्होत्रा यांच्या पुस्तकावर आक्षेप घेतल्याने, ट्रोल केल्याने व्यवसायिक पब्लिशर नी त्यांचे पुस्तकं मागे घेत असल्याचे जाहीर केले. मल्याळम लेखक एस हरीश यांच्या कादंबरी चा काही क्रमश:भाग एका साप्ताहिकात प्रकाशित होत होता. तेव्हा काही जमातवादी लोकांनी आक्षेप घेतल्याने घाबरून संपादक महोदयांनी सदर चा भाग काढून घेत असल्याचे जाहीर केले. व या पुढे असे काही लेख प्रकाशित करणार नाही असे लिहून दिले. अरुंधती रॉय यांचे तामिळनाडू येथील एका विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लागलेले पुस्तकं अभ्यासक्रमातून काढून टाकले. उर्वशी बुटालिया या आदिवासी अभ्यासक लेखक यांना त्यांच्या लिखाणाला देशद्रोही ठरविल्या गेले. सध्याची परिस्थिती लेखक असणे म्हणजे धोका आणि जबादारी आहे. धोका पत्कारून जबाबदारी पार पाडणे हे दोन्ही काम एकचवेळी करावे लागते. पण खरी साहित्यिक ताकद ही काळाच्या मर्यादा ओलांडून पुढे ही टिकते. इतिहास सांगतो की आजवर जे साहित्य दडपले गेले,बंदिस्त केल्या गेले त्यालाच पुढे जगाच्या पाठीवर मोठे स्थान मिळाले आहे. मराठीतले बरेचसे लेखन वास्तवावर आधारलेले आहे. तरी ही काहीजण पलायनवादी विषय निवडतात. भजी खाण्यासाठी पावसाची वाट पाहण्या सारखेच.बरेचसे लेखक निव्वळ कल्पनाविलासात आपली लेखणी खर्ची घालतात. पण खरी साहित्यिक ऊर्जा तीच असते जी वास्तव रेखाटन करते. आजच्या जळत्या प्रश्नांवर थेट बोट ठेवते. वाचकाला विचार करायला प्रवृत्त करते. आजचे वातावरण मला धोकादायक वाटते आहे. पण धोकादायक वातावरणात जर साहित्य निर्माण केल्या गेले तर त्यात संधीही आहे.जगातील बरेचसे चार्चित असलेले , नाटक, कथा,कादंबऱ्या,नवं साहित्य कृती चे निर्माण भीतीदायक वातावरणतच झाले आहे. म्हणून मी भीतीदायक वातावरणाला एक नामी संधी म्हणून पाहतोय. म्हणून मी पुढील लेखनात विस्थापन,स्थानानंतर, भटकंती, भूक, स्त्री दास्य, स्त्री- पुरुष समानता, जाती अंत,पर्यावरण आणि लोकशाही मूल्ये या मुद्द्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.
                    थेट जरी बंदी नसली, पण लेखकांच्या, कलावंताच्या, चित्रकारांच्या, कवी, पत्रकारांच्या मनात भीतीचे वातावरण तयार केले तर सर्वसामान्य लोकात दहशत निर्माण होते. एकदा दहशत निर्माण झाली तर..लोक आपोआप स्वतःच गप्प बसतात. हीच खरी "अघोषित आणीबाणी "आहे. लेखकाला नैतिक अधिष्ठान हवेच. आज व्यावसायिकता, बाजारपेठ, आणि भीतीमुळे हे अधिष्ठान थोडे फार ढासळले आहे. तरीही काही लेखक ठामपणे उभे आहेत, हीच खरी आशा आहे. हा परीक्षेचा काळ आहे. लेखकाच्या धैर्याची, प्रामाणिकतेची, जबाबदारीची कसोटी पाहणारा काळ आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणं म्हणजेच साहित्यिक बांधिलकी पार पाडणे होय. मी सध्या समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित लेखन करत आहे. कथा, कादंबरी असो वा लेख, मला वाटते विस्थापित, भुकेले, पीडित, शोषित, नाही रे वर्गाचा आवाज बनणे आधार होणे. हीच लेखकाची खरी जबाबदारी आहे. त्या साठी मी प्रयत्नशील आहे. आजचा काळ लेखकासाठी आव्हानांचा आहे, पण संधींचाही आहे. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जपण्यासाठी लेखकाने धाडसाने, प्रामाणिकतेने लिहित राहिले पाहिजे. भीतीवर, दहशती वर, दडपशाही वर मात करून लिहिणे हाच खरा प्रतिकार आहे. कारण इतिहास नेहमी त्यांनाच स्मरतो, त्यांचीच आठवण ठेवतो ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही सत्याला शब्द दिले.
    
संकलन - पवन भगत, बल्लारपूर 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)