बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबरला पार पडली. मात्र, येथील प्रभाग क्रमांक ९ मधील एका जागेवरील निवडणूक २० डिसेंबरला मतदान होत असल्याने २१ डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ८ टेबलची व्यवस्था केली आहे. बल्लारपूर शहरात प्रथम नागरिक कोण होणार व नगरसेवकपदाची लॉटरी कोणाला लागणार, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी महिला राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी ८ महिलांनी निवडणुकीचे मैदान गाजविले. त्याचप्रमाणे ३४ नगरसेवक पदांसाठी तब्बल १९२ उमेदवारांनी निवडून येण्यासाठी आपल्या जीवाचे रान केले. बल्लारपूर येथील एकूण ८३,८२१ मतदारांपैकी ४६,३६० मतदारांनी मताधिकार बजावला. यामध्ये २३,६२९ पुरुष व २२,७३१ महिला मतदारांचा समावेश आहे. येथील मतदानाची टक्केवारी ५५.३१ इतकी ठरली होती. बल्लारपूर नगरपालिका निवडणूक मतमोजणी नगरपालिका कार्यालय इमारती मध्ये होणार असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. एकूण ९५ मतदान केंद्रातील मतमोजणीसाठी ८ टेबलची व्यवस्था केली आहे. यासाठी २ राखीव मतमोजणी पथकांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी साठी ही व्यवस्था करण्यात आली आहे विशेष म्हणजे येथील नगराध्यक्ष पदाची निवडणूक चांगलीच गाजली असून मतदार नगराध्यक्ष कोण होणार, म्हणून तर्कवितर्क लावत आहे. येथील नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक भाजपासाठी सौ रेणुकाताई दुधे अत्यंत प्रतिष्ठेची झाली असून काँग्रेस पक्ष सौ अल्काताई वाढई यांच्या रूपात आपले अस्तित्व मिळविण्यासाठी झुंज देत आहे. तर सौ चैताली दिपक मुलंचदानी यांच्या रूपात ज्येष्ठ नेते घनश्याम मुलचंदानी यांनी आपली राजकीय अस्तित्व पणाला लावून शिवसेना (उबाठा) पक्ष देखील आपलाच नगराध्यक्ष निवडून येणार म्हणून दावेदारी पुढे करीत आहे. येथील मतदारांच्या तर्कवितर्काला २१ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीनंतर पूर्णविराम मिळणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या