बल्लारपूर नगरपरिषदेत अनेक नव्या चेहऱ्यांना नगरसेवक म्हणून कार्य करण्याची संधी, बल्लारपूर शहरातील मतदारांनी 8 माजी नगरसेवकांना पुन्हा संधी दिली तर 26 नव्या चेहऱ्यांना पहिल्यांदाच संधी (In the Ballarpur Municipal Council, many new faces have received the opportunity to serve as councilors. While voters in Ballarpur city gave another chance to 8 former councilors, 26 new faces have been given the opportunity for the first time.)
बल्लारपूर :- बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असून, काँग्रेसने सुमारे सहा जागांवर वाढ मिळवत नगराध्यक्ष पदावर आपला ताबा प्रस्थापित केला आहे. निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या व लोकप्रिय उमेदवारांना डावलून नव्या उमेदवारांना संधी दिल्याचा फटका भाजपला बसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील वस्ती विभागातील प्रभाग क्रमांक चौदामध्ये भाजपचे लोकप्रिय व निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार गणेश बहुरिया यांना तिकीट न देता अजहर शेख यांना उमेदवारी देण्यात आली. याच प्रभागात भाजप समर्थक अपक्ष उमेदवार प्रकाश दोतपेल्ली निवडणूक रिंगणात उतरल्याने लढत चुरशीची झाली आणि त्याचा थेट फायदा काँग्रेसला झाला. भाजपने गणेश बहुरिया यांनाच उमेदवारी दिली असती, तर किमान दोन जागांचे नुकसान टळले असते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रभाग क्रमांक सतरा मधून सलीम नबी अहमद अपक्ष म्हणून विजयी झाले. या संपूर्ण परिसरात भाजपला पाच जागांचे नुकसान सहन करावे लागले आहे. मागील निवडणुकीत बस्ती विभागातून भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले होते आणि नगराध्यक्षपदासाठी आघाडी मिळाली होती. प्रभाग क्रमांक नऊ मध्येही भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या पत्नी यांचा या प्रभागात पराभव झाला. येथे पक्षाच्या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याने स्थानिक पातळीवर नाराजी पसरली आहे अशी चर्चा सुरु आहे. या नाराजीचा थेट परिणाम मतदानावर झाल्याचे बोलले जात आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात, नऊ, चौदा आणि सतरा या प्रभागांकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले होते.
तसेच काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्यावर लागलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निकालाची वाट न पाहता पक्ष श्रेष्ठीनी माजी शहराध्यक्ष अब्दुल करीम यांची प्रभारी म्हणून तातडीने नियुक्ती करण्यात आली. यामुळे शहरात चर्चांना उधाण आले. निकाल काँग्रेसच्या बाजूने लागल्यानंतरही देवेंद्र आर्य दोषी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आर्य यांच्यावर काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात दुसऱ्या पक्षासाठी प्रचार व सहकार्य केल्याचा आरोप होता. मात्र, जाणकारांच्या मते देवेंद्र आर्य यांच्या समयसूचकतेने काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला असून प्रभाग क्रमांक सतरा मधूनही नगरसेवक विजयी झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव सहाव्यांदा नगर परिषदेत निवडून आले असून शिवसेनेची वाढती ताकद दिसून आली आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पाच नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राकेश सोमानी आणि सुमित डोहणे यांच्या समन्वयाचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, पक्षाने तीन जागांवर खाते उघडले आहे. शिवसेना (शिंदे गट)कडून अविनाश मठ्ठा यांनी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करत विजय मिळवला आहे. बल्लारपूरच्या जनतेने अनेक प्रभागांमध्ये युवकांना संधी दिल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे शहरात कुठे आनंद तर कुठे नाराजी व निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे बल्लारपूर शहरातील मतदारांनी 8 माजी नगरसेवकांना पुन्हा संधी दिली तर 26 नव्या चेहऱ्यांना पहिल्यांदा निवडून दिले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या