धम्मचक्र प्रवर्तन : आधुनिक काळातील शस्त्रहीन तसेच रक्तविहीन झालेली क्रांती (Dhammachakra Pravartan : A modern-day weaponless and bloodless revolution)

Vidyanshnewslive
By -
0
धम्मचक्र प्रवर्तन : आधुनिक काळातील शस्त्रहीन तसेच रक्तविहीन झालेली क्रांती (Dhammachakra Pravartan : A modern-day weaponless and bloodless revolution)

नागपूर :- विजयादशमीनिमित्त आज नागपूरच्या दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न होत आहे. त्यानिमित्त एका वैचारिक परिवर्तनाचे हे शब्दचित्र ! विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील एक महान विचारवंत आणि क्रांतिकारी नेते होते. ते आधुनिक भारताचे शिल्पकार, त्यांचे क्रांतिकारी विचार आणि चळवळीमुळे शतकानुशतके गुलामीच्या निद्रेत असलेल्या समाजगटाने शेकडो वर्षाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक श्रृंखला तोडल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यांनी बौद्ध धम्माचे थांबलेले चक्र पुन्हा गतिमान केले आणि भारतात 'बुद्धमं शरणं गच्छामि ! 'चा मधुर स्वर निनादला. दीक्षाभूमी ही या देशातील आणि जगभरातील करोडो लोकांची प्रेरणाभूमी ठरली.
        १७७९ च्या फ्रेंच आणि १९१७ च्या रशियन क्रांतीमुळे त्या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात प्रचंड परिवर्तन झाले. आधुनिक काळातील या दोन क्रांती महत्त्वपूर्ण मानल्या जातात, तर भारतात डॉ. आंबेडकरांनी मानवी अधिकारापासून वंचित आठ लाख अस्पृश्यांची हिंदूंच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गुलामीतून मुक्त केले. ही जगातील एक महान क्रांती आहे. ती हिंसेच्या बळावर नाही तर वैचारिक परिवर्तनाच्या आधारे झाली. ही शस्त्रविरहित क्रांती होती. कोणत्याही प्रकारचा रक्तपात न होता एवढी मोठी क्रांती झाली. शोषणाचे बळी ठरलेल्या अस्पृश्यांना 'माणूस' म्हणून जगण्यासाठी बाबासाहेब यांनी बुद्ध धम्म दिला. बुद्ध धम्माचा स्वीकार ही त्यांच्या जीवनातील अत्यंत क्रांतिकारी घटना ठरली. बुद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर धर्मांतरित बौद्धांना आपल्या उत्थानाचा आणि विकासाचा मार्ग मिळाला. कालचा अस्पृश्य समाज बौद्ध म्हणून बुद्ध धम्माच्या मार्गाने वाटचाल करू लागला. बुद्ध धम्मामुळे बौद्धांना नवीन विचारसरणी मिळाली. ही विचारसरणी त्यांच्या दृष्टिकोनातून क्रांतिकारी होती. कालपर्यंत हिंदू धर्मग्रंथाच्या आदेशानुसार निमुटपणे वागणारा हा अस्पृश्य समाज विवेकबुद्धीने विचार करून पाऊल टाकू लागला. बुद्ध धम्माच्या स्वीकारानंतर धर्मातरित बौद्ध समाजात प्रचंड वैचारिक परिवर्तन घडून आले. कोणत्याही परिवर्तनाचा आरंभ हा विचारातून होत असतो. आता बौद्ध समाज विचारपूर्वक कृती करू लागला. समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रात हे परिवर्तन घडून आले. बुद्ध धम्म हा निरीश्वरवादी आहे. म्हणून धर्मातरित बौद्धांनी देव, ईश्वर ही संकल्पना नाकारली. देव, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक या धार्मिक गोष्टींच्या माध्यमातून आपले मानसिक, सामाजिक शोषण झाले आहे हे लक्षात घेऊन बौद्ध लोकांनी जाणीवपूर्वक या सर्व परंपरागत धार्मिक संस्कारांना आपल्या जीवनातून हद्दपार केले. कोणताही देव आपले भविष्य घडवू शकत नाही तर आपल्यालाच आपले उज्ज्वल भविष्य घडवायचे आहे. असा विचार करून ते नव्या दिशेने मार्गस्थ झाले. बुद्ध धम्म हा माणुसकीचा धम्म. त्यात प्रकारच विषमता नाही. बुद्ध धम्मानुसार आचरण केल्या आपण आपली आणि राष्ट्राची प्रगती करू शकत असा विश्वास निर्माण झाल्याने धर्मातरित बौद्धां आपली पारंपरिक सांस्कृतिक व्यवस्था नाकारत आणि बुद्ध धम्मावर आधारित आपले नवे सांस्कृतिक विश्व निर्माण केले.
                 परंपरागत धर्मव्यवस्थेने व्यक्ती विचारस्वातंत्र्य नाकारल्यामुळे वर्षानुवर्षे भारतीय समाजात वैचारिक परिवर्तन होऊ शकले नाही धर्मातरित बौद्धांनी वैचारिक गुलामीतून स्वतः मुक्तता करून घेतली. त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोण विकसित झाला. शिक्षणाशिवाय आपले अस्तित्व नाही याची जाणीव झाली. शिक्षण हाच विकासाच मार्ग आहे, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून शेकडो वर्षांपासून शिक्षणापासून वंचित असलेला समाज आपली शैक्षणिक भूक भागविण्यासाठी शिक्षणाकडे वळला. बौद्धांनी आपल्या मुलांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकविले. धर्मातरित बौद्धांमधील शैक्षणिक क्रांती झाली. इतर धर्माच्या तुलनेत बौद्धांमध्ये शिक्षणाचे प्रमाण जास्त आहे. २०११ च जनगणनेनुसार बौद्ध समाजात शिक्षणाचे प्रमाण ८१.२९ टक्के होते. बौद्धांचा शैक्षणिक विकास धम्मक्रांतीचा परिणाम होय.

अतिथी मार्गदर्शक :- डॉ. प्रदीप आगलावे
सदस्य सचिव, डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, नागपूर

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)