लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, पुनर्वसन कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी खांडेकर लाच स्वीकारताना अटक (Anti-Corruption Department action, Assistant Revenue Officer Khandekar of Rehabilitation Office arrested while accepting bribe)
चंद्रपूर :- जिल्हा पुनर्वसन कार्यालय, प्रशासकीय भवन चंद्रपूर येथे कार्यरत असलेले सहायक महसूल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो (ACB) चंद्रपूरच्या पथकाने रंगेहात पकडले. विशेष म्हणजे तक्रारदार यांच्या आईची मालमत्ता औष्णीक विद्युत केंद्र, चंद्रपूर येथे गेलेली होती. त्यामुळे तक्रारदार यांच्या मुलीचे नाव प्रकल्पग्रस्त म्हणून नोंदविण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्या. मुंबई यांनी घेतलेल्या परीक्षेत तक्रारदारांची मुलगी कनिष्ठ अभियंता या पदासाठी निवडली गेली. त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जुलै २०२५ मध्ये जिल्हा पुनर्वसन कार्यालय, चंद्रपूर येथे पत्र आले. त्यानंतर तक्रारदार आपल्या मुलीसह कार्यालयात सहायक महसूल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांना भेटले. या वेळी खांडेकर यांनी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पडताळणी करून अहवाल मुंबईला पाठविण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर तक्रारदारांना १ लाख रुपये तात्काळ आणि पडताळणी अहवाल पाठवल्यानंतर उर्वरित ३० हजार रुपये देण्याचे सांगण्यात आले.त्यानुसार, तक्रारदारांनी जुलै २०२५ मध्ये १ लाख रुपये दिले होते.
२६ सप्टेंबर २०२५ रोजी तक्रारदारांनी फोनवरून खांडेकर यांना पडताळणी अहवालाविषयी विचारणा केली असता, खांडेकर यांनी कार्यालयात बोलावून उर्वरित ३० हजार रुपये घेऊन या, अन्यथा अहवाल पाठवणार नाही, असे सांगितले. लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदारांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे तक्रार नोंदवली. ए सी बी अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता खांडेकर यांनी स्वतःकरीता ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज २८ सप्टेंबर २०२५ पंचासमक्ष सापळा लावण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्यासह हव. हिवराज नेवारे, विजेंद्र वाढई, पो.शि. अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, राजेंद्र चौधरी, सचिन गजभिये, महेश माहूरपवार, म.पो.शि. मेधा गोहुर्ले, पुष्या काचोळे, चा.पो.शि. सतिश सिडाम, संदीप कौरोसे आदींचा समावेश होता. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्यूज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या