ओडिशा राज्यातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची चंद्रपूर वन अकादमीला भेट (Senior forest officials from Odisha state visit Chandrapur Forest Academy)

Vidyanshnewslive
By -
0
ओडिशा राज्यातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची चंद्रपूर वन अकादमीला भेट (Senior forest officials from Odisha state visit Chandrapur Forest Academy)


चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्यातील प्रमुख वन प्रशिक्षण संस्था म्हणून ओळखली जाणारी चंद्रपूर वन अकादमी ही संस्था वन व्यवस्थापन, वन्यजीव संरक्षण, जैवविविधता, पर्यावरणीय कायदे, समुदाय प्रतिबद्धता आणि प्रशासन यासह विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या संस्थेची माहिती व प्रशिक्षण पद्धती व सुविधा यांचा अभ्यास करण्यासाठी ओडिशा राज्यातील भारतीय वन सेवेतील चार वरिष्ठ अधिकारी 29 व 30 मे 2025 रोजी चंद्रपूर वन अकादमीच्या भेटीवर आले होते. या अभ्यास दौऱ्यात मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मनोज व्ही. नायर, मुख्य वनसंरक्षक बिकाश रंजन दाश, वनसंरक्षक स्वयंम मल्लीक आणि संग्राम केशरी बेहरा यांचा समावेश होता. भेटीदरम्यान अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा चंद्रपूर वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिथींना संस्थेतील आधुनिक व सुसज्ज असलेले प्रगत प्रशिक्षण केंद्र, व्याख्यान कक्ष, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, अद्ययावत ग्रंथालय, निवास व भोजन व्यवस्था तसेच क्रीडांगण यांची पाहणी करून माहिती देण्यात आली. ओडीसा राज्यातील चमुने पाहणी करतांना सत्र संचालक व उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांपासून वनपरिक्षेत्र अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांपर्यंत राबविण्यात येणाऱ्या दीर्घ व अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रमांची रूपरेषा, त्यातील योग व शारीरिक शिक्षण अभ्यास, तसेच प्रशासकीय व तांत्रिक बाबी यावर सादरीकरण करण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला ओडीशा राज्यातील वन अधिकाऱ्यांसह वन अकॅडमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, अपर संचालक (प्रशासन) अविनाश कुमार, अपर संचालक (मुख्यालय) मनिषा भिंगे, सत्र संचालक संजय दहिवले, संभा गवळी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अकादमीला NABET (नॅशनल अक्रेडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग) कडून उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता प्राप्त झाली असून ISO प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले आहे, याची माहिती यावेळी देण्यात आली. भेटीअंती ओडिशा राज्यातील अधिकाऱ्यांनी चंद्रपूर वन अकादमीच्या प्रशिक्षण पद्धती, गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम आणि अद्ययावत प्रशिक्षण सोई सुविधांची प्रशंसा करत चंद्रपूर वन अकादमी व महाराष्ट्र वन विभागाचे आभार मानले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)