चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या अवैध धंदे, जुगार, सट्टा व्यवसाय व मादक पदार्थाच्या तस्करी वर नियंत्रण येणार ? (Will the growing illegal businesses, gambling, betting and drug trafficking in Chandrapur district be controlled ?)
चंद्रपूर :- औद्योगिक नगरी, अशी ओळख असलेल्या या जिल्ह्याला विपुल खनिज आणि वनसंपत्तीचे वरदान आहे. मात्र, राजकीय आशीर्वाद असलेल्या तस्करांकडून या खनिज संपत्तीची अक्षरश: लुट सुरू आहे. अवैध व्यवसाय व तस्करीत सर्वच पक्षाचे नेते आणि दुसऱ्या फळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय आहेत. दारूबंदीच्या काळात जिल्ह्यातील नेत्यांच्या आशीर्वादानेच दारूची तस्करी सुरू होती. आता दारूबंदी उठल्यानंतर बनावट व अवैध दारू तस्करी सुरू आहे. गोंडपिंपरी व चिमूर येथे नुकतीच बनावट दारू पोलिसांनी पकडली. यामागील मुख्य आरोपी फरार आहे. अवैध तंबाखू व गुटख्याचा व्यापार येथे सुरू आहे. शहरातील प्रत्येक पानठेला, टपरीवर सुगंधी तंबाखू छुप्या मार्गाने मिळतो. अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने हा प्रकार येथे सर्रास सुरू आहे. 'ब्राऊन शुगर' व 'एमडी' हे अमली पदार्थ नागपूर येथून शहरात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी एक-दोन कारवाया केल्या. मात्र, युवा पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या व्यवसायातील सर्व आरोपी समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरत आहेत. सट्टापट्टी व आयपीएल क्रिकेट सट्टा या व्यवसायालाही राजकीय आशीर्वाद प्राप्त आहे. राजुरा येथील एक-दोन कारवाया सोडल्या तर सर्व सट्टा व्यावसायिक शहरात उजळ माथ्याने फिरताना दिसतात. आमचे सर्वांशी 'सेटिंग' झाले आहे. आता आमचे कुणीच काही बिघडवू शकत नाही, याच थाटात ते वावरतात. भंगार चोरीचा व्यवसाय जिल्ह्यात सर्वत्र फोफावला आहे. बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर या तेलंगणा राज्याला लागून असलेल्या तालुक्यांमध्ये 'रमी क्लब'चा सुळसुळाट आहे. मनोरंजनाच्या नावावर या 'क्लब'ला परवानगी दिली असली तरी तिथे मोठ्या प्रमाणात अवैध कामे चालतात हे सर्वश्रृत आहे. एकूणच या जिल्ह्यात शेकडो अवैध धंदे, व्यवसाय सर्रास सुरू आहे. शेतीचा हंगाम सुरू होताच बीटी बियाणांच्या अवैध व्यवसायातून शेतकऱ्यांची उघड फसवणूक केली जात आहे. मात्र, या अवैध व्यावसायिकांचे अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याने शेतकऱ्यांनाही कुणी वाली उरला नाही, अशी चर्चा आहे. अमाप पैसा मिळवून देणाऱ्या अवैध कोळसा व वाळू तस्करी या दोन व्यवसायावर तर पूर्णपणे राजकारण्यांचे वर्चस्व आहे. राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असलेले सर्व पक्षातील दुसऱ्या फळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते या व्यवसायात सक्रिय आहेत. जिल्ह्यातील बहुतांश वाळू घाट पक्षीय पदाधिकाऱ्यांनाच मिळाले आहे. लोकप्रतिनिधीच या व्यवसायात भागीदार आहेत. त्यामुळे पोलीस व महसूल विभागातील अधिकारी थातूरमातूर कारवाया करून मोकळे होतात. आजवर वाळू व कोळसा तस्करांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्याचे उदाहरण जिल्ह्यात नाही. वाळू तस्करी रात्रीच्या अंधारात जोरात सुरू असून जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, अंधारी या नद्या तस्करांनी अक्षरश: पोखरून काढल्या आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या