सामाजिक न्याय समता सप्ताह व न्याय पर्वाचे उद्घाटन, समता पर्व सप्ताह' निमित्त जात वैधता प्रमाणपत्राचे ऑनलाईन वाटप व त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन (Inauguration of Social Justice Equality Week and Justice Parva, online distribution of caste validity certificate and organization of error correction camp on the occasion of 'Equality Parva Week')
चंद्रपूर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी पर्वावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय समता सप्ताह व सामाजिक न्याय पर्वाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण येथे पार पडले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक लेखाधिकारी दीपक धात्रक तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, समाजकल्याण निरीक्षक मनोज माकोडे, पुनम आसेगावकर, बहिरमवार मॅडम, एस. ए. लक्कावार यांची उपस्थिती होती. 8 ते 14 एप्रिल पर्यंत समता सप्ताह आणि 11 एप्रिल ते 1 मे पर्यंत सामाजिक न्याय पर्व साजरे केले जाणार आहे. यामध्ये संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले जयंतीदिनी 11 एप्रिल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी 14 एप्रिल रोजी प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये जाऊन सामाजिक न्याय व बार्टीच्या योजनांची माहिती देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन, सफाई कर्मचाऱ्यांसाठी जनजागृतीपर कार्यशाळा, दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची कार्यशाळा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, आई-वडील व जेष्ठ नागरिक चरितार्थ कल्याण अधिनियम, जादूटोणाविरोधी कायदा व प्रचार अधिनियमवर आधारीत कार्यशाळा व प्रात्यक्षिक, तृतीयपंथीयाच्या कल्याण व हक्काच्या संरक्षणाकरीता जनजागृती तसेच तृतीयपंथीयांचे आरोग्य शिबिर, विविध महाविद्यालयामध्ये स्थापित असलेल्या समान संधी केंद्रांमध्ये नशा मुक्ती अभियान व व्यसनमुक्ती वर प्रबोधन, शाळा, महाविद्यालय व शासकीय वसतिगृहामध्ये विविध स्पर्धा इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या या पर्वात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संचालन बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी केले तर आभार संदीप रामटेके यांनी मानले. यावेळी समतादुत उपेंद्र वनकर यांनी संविधान गीत सादर केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 8 ते 14 एप्रिल पर्यंत ‘समता सप्ताह’ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत या कार्यालयामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून समितीला प्राप्त झालेल्या प्रकरणांची जलद गतीने तपासणी करून अर्जदारांना विहीत मुदतीपूर्व 8 एप्रिल रोजी CCVIS या प्रणालीतून ऑनलाईन 50 जात वैधता प्रमाणपत्र अर्जदारांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी वर निर्गमीत केलेले आहेत. जात वैधता प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) दत्तप्रसाद नडे यांच्या नेतृत्वाखाली व उपायुक्त तथा सदस्य डॉ. सिध्दार्थ गायकवाड, संशोधन अधिकारी आशा कवाडे यांच्या विशेष प्रयत्नाने वरील मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. तसेच समितीकडे आक्षेप पूर्ततेकरिता प्रलंबित असलेली प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेप त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन 8 ते 14 एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय दुध डेअरी रोड, चंद्रपुर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आलेले आहे. ज्या अर्जदारांनी समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केले आहेत व ज्यांच्या प्रकरणात समितीने आक्षेप नोंदविलेला आहे, अशा अर्जदारांना CCVIS या प्रणालीवरुन त्यांच्या नोंदणीकृत Email ID वर आक्षेप पूर्ततेचा संदेश पाठविण्यात आलेला आहे. असा संदेश प्राप्त झालेल्या अर्जदारांनी त्यांची सर्व मुळ कागदपत्रे घेऊन समिती कार्यालयात 8 ते 14 एप्रिल रोजी उपस्थित राहावे, आक्षेपाची पूर्तता केल्यानंतर लवकरात लवकर जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात येणार आहे. विशेष मोहिमेत जास्तीत जास्त अर्जदारांनी सहभागी होण्याचे आव्हान उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या