स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता व सत्यधर्म सांगणारा महात्मा (Mahatma who advocated women's education and preached the truth)
वृत्तसेवा :- महात्मा फुले हे खरे समाजशिक्षक होते. समाज परिवर्तनासाठी रचनात्मक कार्य आणि रचनात्मक कार्यासाठी समाज परिवर्तन त्यांनी अपरिहार्य मानले. या दोहोंचा मूळ पाया त्यांचा क्रांतीगर्भ विचार हा होता. अस्पृश्य आणि अस्पृश्यता यासंबंधी त्यांनी वेळोवेळी मांडलेले परखड विचार ही त्याची साक्ष होय. महात्मा फुले यांचा प्रयत्न केवळ महाराष्ट्राच्याच दृष्टीने नव्हे तर संपूर्ण भारताच्या दृष्टीने अभिनव होता. विसावे शतक हे राजकारण सर्वस्पर्शी करणारे शतक असल्याने भारतातील सर्व सामाजिक प्रश्नांना हळूहळू राजकीय स्वरूप येऊ लागले. त्यामुळे सामाजिक प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिक गुंतागुंतीचे तर झालेच; परंतु राजकीय चळवळीसुद्धा त्यामुळे अधिक अडचणीत आल्या. महात्मा फुले यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि भारत एक राष्ट्र होण्यासाठी जो सामाजिक न्यायाचा विचार पुढे केलेला होता तो अतिशय महत्त्वाचा आहे. महात्मा फुले यांनी आपल्या साहित्यातून तत्कालीन समाजातील जातिभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्ध आपल्या प्रतिक्रिया मांडल्या. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. तत्कालीन समाजाचे झालेले वर्गनिष्ठ विभाजन आणि त्यातून निर्माण झालेली सामाजिक व आर्थिक विषमता त्यांना प्रकर्षाने जाणवली होती. या समाजात मूठभर लोकांच्या ठिकाणी सामाजिक वर्चस्व आणि आर्थिक सत्ता केंद्रित झालेली आहे व हा वर्ग समाजातील बहुजनांची सामाजिक व आर्थिकदृष्ट्या पिळवणूक करीत आहे हे त्यांच्या लक्षात आलेले होते. या सामाजिक व आर्थिक वर्चस्वाचे मूलाधार आणि त्यातून निर्माण होणार्या अन्यायाचे स्वरूप यांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महात्मा फुले यांच्या विचारांचा संदर्भ व दिशा वेगळी होती.
आज प्रचलित असलेल्या राजकीय विचारांच्या अनुषंगाने जर महात्मा फुले यांचा विचार केला तर असे दिसते की, महाराष्ट्र समाजाला पहिल्यांदा वर्गीय जाणीव आणि वर्गीय दृष्टी देण्याचे काम महात्मा फुले यांनी केले; परंतु या वर्गीय जाणिवेतून वर्गविहित समाजाची निर्मिती होईल असे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. धर्माच्या आधारे निर्माण झालेली सामाजिक विषमता नष्ट झाली पाहिजे व सर्वजण मानव म्हणून एकत्रित आले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता.फुले हे धर्मविरोधक नव्हते; परंतु त्याकाळी धर्माला आलेले विकृत स्वरूप कर्मकांडाचे व पुरोहित वर्गाचे प्राबल्य व लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन केली जाणारी धार्मिक पिळवणूक त्यांना मान्य नव्हती. म्हणून मानवतावादाचा पुरस्कार करणार्या एका नव्या 'सार्वजनिक सत्यधर्माची' कल्पना त्यांनी पुढे मांडली. शूद्रातिशुद्रांची सामाजिक दास्यातून मुक्तता व्हावी, जातिभेद व अस्पृश्यता नष्ट व्हावी तसेच पुरुषांनी लादलेल्या रूढींच्या जोखडातून स्त्रियांची मुक्तता व्हावी, असेही त्यांना वाटत होते. स्त्रियांना पुरुषांइतके स्वातंत्र्य व हक्क उपभोगता येऊ शकतील अशी समाजरचना त्यांना निर्माण करावयाची होती. म्हणून स्त्री शिक्षणाचा आग्रह धरून मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांच्या लिखाणाचे समग्र परिशीलन केल्यानंतर त्यांच्या मर्मग्राही व सर्वस्पर्शी बुद्धिमत्तेची व सखोल चिंतन करणार्या वृत्तीची प्रचिती पदोपदी येते. त्याचबरोबर भविष्यकाळाचा अचूक वेध घेणार्या त्यांच्या बौद्धिक क्षमतेचीही साक्ष पटते. समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य आधुनिक काळात फुले यांनी प्रथमतः केले. यात त्यांचे महात्मेपण आहे. या समस्यांचे निराकरण फुटकळ स्वरूपाच्या सुधारणा घडवून आणणार्या जुजबी उपाययोजनांनी होणार नाही, त्यासाठी समाजरचनेची सबंध चौकट बदलणे जरुरीचे असा सामाजिक क्रांतीचा विचार त्यांनी मांडला. छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी शोधून त्यांच्यावरील पहिला पोवाडा लिहिण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले. फुले हे सामाजिक कार्यासोबतच यशस्वी लेखक आणि संपादक होते. तत्कालीन व्यवस्थेत समाजजीवनाची स्थिती, वर्णभेद यावर त्यांनी त्यांच्या लेखनशैलीतून कडाडून टीका केली. यातील 'तृतीय रत्न' हे वयाच्या 28 व्या वर्षी 1855 मध्ये त्यांनी लिहिलेले एक महत्त्वपूर्ण नाटक आहे. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा समाजाला दिशा देणारा एक महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ त्यांनी तयार केला. समाज व्यवस्थेला दिशा देणारा 'गुलामगिरी' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्यांना मुंबईतील सभेत 1888 मध्ये 'महात्मा' ही उपाधी दिली. त्यामुळे जोतीराव फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या