मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी क्रीडा अकादमीचे सक्षमीकरण आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन (Call for proposals for financial assistance for empowerment of private sports academies under Mission Lakshyavedh)

Vidyanshnewslive
By -
0
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी क्रीडा अकादमीचे सक्षमीकरण आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन (Call for proposals for financial assistance for empowerment of private sports academies under Mission Lakshyavedh)
चंद्रपूर : महाराष्ट्रात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्याकरीता नियोजनबध्द प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूकरिता करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी/ विदेशी प्रशिक्षक व संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्वाकाक्षी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या ॲथलेटिक्स, आर्चरी, बैडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शुटींग, रोलींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती या 12 क्रीडा प्रकारचे राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खाजगी अकादमीना आर्थिक सहाय्य देऊन अशा संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य करवायाच्या दृष्टीने संबधित अकादमी मधील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरीचे गुणांकन करण्यात येणार आहे. 35 ते 50 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘क’ वर्गात, 51 ते 75 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘ब’ वर्ग आणि 76 ते 100 गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ‘अ’ वर्गात वर्गीकरण करण्यात येणार आहे. ‘क’ वर्ग अकादमींना वार्षिक 10 लक्ष रुपये, ‘ब’ वर्ग अकादमीना वार्षिक 20 लक्ष रूपये आणि ‘अ वर्ग अकादमीना वार्षिक 30 लक्ष रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. यात पायाभूत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे आदी बाबींवर खर्च करणे बंधनकारक आहे. इच्छुक संस्थांनी अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सह संचालक सुधीर मोरे यांनी केले आहे. खाजगी अकादमींना भरून द्यावयाचा अर्ज नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे उपलब्ध असून अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्याशी संपर्क करावा, असे क्रीडा विभागाने कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)