लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे 3 कर्मचारी लाच घेतांना अटक (Anti-Corruption Department action, 3 Chandrapur Zilla Parishad employees arrested while taking bribe)
चंद्रपूर :- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत जिल्हा परिषद चे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, वरिष्ठ सहायक, परिचर यांना एका ठेकेदार कडून ४ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सदर कारवाई १० एप्रिल रोजी करण्यात आली. हर्ष यशोराम बोहरे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परीषद, सुशील मारोती गुंडावार वरीष्ठ सहायक, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परीषद, चंद्रपूर व मो. मतीन फारुख शेख, परीचर (कंत्राटी), ग्रामीण पाणी पुरवठा असे लाच घेणारे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार जिवती येथील रहिवासी असून त्यांचे महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत तालुका जिवती आणि राजुरा येथील एकूण २३ गावांमध्ये पाणीपुरवठा संबंधी केलेल्या कामांपैकी १० गावांतील कामांचे बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरीकरीता सादर केले होते, त्यापैकी ५ गावांचे कामांचे एकुण ४३ लाख रूपयांचे बिले तक्रारदार यांना मिळाले. प्राप्त तक्रारीवरून ०७ एप्रिल २०२५, ०९ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान हर्ष बोहरे, कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तक्रारदार यांना ४ लाख २० हजार रुपयाचे लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून १० एप्रिल रोजी सापळा कारवाई दरम्यान सुशील गुंडावार यांनी लाच रक्कम ४ लाख २० हजार रूपये पंचासमक्ष स्वतः स्विकारून त्यापैकी २० हजार रूपये स्वतः करीता वेगळे काढून उर्वरीत ४ लाख रूपये मतीन शेख यांना हर्ष बोहरे यांना देण्यास सांगीतल्याने मो. मतीन शेख यांनी सुशील गुंडावार यांचे सांगणेवरून हर्ष बोहरे यांचे घरी नेऊन दिली. सदरची लाचरक्कम स्वीकारणारे हर्ष बोहरे व सुशील गुंडावार यांना ताब्यात घेण्यात आले तसेच लाचरक्कम नेऊन देणारे मतीन शेख यांना ताब्यात घेण्यात आले असुन आज ११ एप्रिल २०२५ रोजी पो. स्टे. रामनगर, जि. चंद्रपूर येथे आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. सदरची कार्यवाही डॉ. दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर, सचिन कदम अपर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. नागपूर, संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले, ला. प्र. वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. नि. जितेंद्र गुरनूले, पो. हवा. हिवराज नेवारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, पो. अं. अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, वैभव गाडगे, म. पो. अं. पुष्पा काचोळे, चा. पो. अं. सतिश सिडाम, संदिप कौरासे यांनी यशस्वी पार पाडली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या