राज्यभरात एकाच वेळी होणार पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा (1st to 9th annual exams will be held simultaneously across the state)

Vidyanshnewslive
By -
0
राज्यभरात एकाच वेळी होणार पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा (1st to 9th annual exams will be held simultaneously across the state)
वृत्तसेवा :- राज्यात पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा मार्च किंवा एप्रिल महिन्यात शाळा स्तरावर त्यांच्या नियोजनानुसार घेतल्या जातात. मात्र, यंदाची वार्षिक परीक्षा राज्यात एकाचवेळी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यात शाळास्तरावर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच वार्षिक परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर एक मे पर्यंत शाळा सुरूच असते. मात्र, वार्षिक परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतच नाहीत. वर्षाच्या शेवटी परीक्षा घेण्याऐवजी त्या1 अगोदरच घेतल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पुरेसा कालावधी मिळत नाही. याशिवाय वार्षिक परीक्षेचे राज्यातील सर्व शाळांचे वेळापत्रक वेगवेगळे असते. हे सर्व थांबून राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी व विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा, यासाठी राज्यातील पहिली ते नववीच्या वर्गातील वार्षिक परीक्षा एकाचवेळी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आठ एप्रिलपासून पहिली ते नववीच्या वर्गाच्या वार्षिक परीक्षा होणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी राज्यातील शाळांच्या वार्षिक परीक्षेसाठी एकच वेळापत्रक तयार केले आहे. या वेळापत्रकाप्रमाणे राज्यातील सर्व शाळांनी परीक्षा घ्यायची आहे. स्थानिक परिस्थितीनुसार यामध्ये बदल करायचा असेल तर संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकार्‍यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांची परवानगी घेऊनच बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात पहिली ते नववीच्या वर्गाची वार्षिक परीक्षा आठ एप्रिलपासून सुरू होत आहे. ही परीक्षा 25 एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यानंतर शिक्षकांनी पेपरची तपासणी करून 1 मे या महाराष्ट्रदिनी विद्यार्थ्यांना निकाल द्यायचा आहे. दोन मे पासून विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी देण्यात येणार असल्याचेही त्यामध्ये नमूद केले आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी ज्या विषयाचा पेपर आहे, त्याचदिवशी त्या विषयाची तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायची आहे. जर शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल, तर ती दुसर्‍या दिवशी किंवा उपलब्ध वेळेनुसार घ्यावी. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे त्या विषयाची परीक्षा त्याच दिवशी घेण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)