20 कोटींच्या निधीतून सुरू होणार शहरातील प्रमुख मार्गांचे काम. सीवरेजसाठी खोदलेल्या रस्त्यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी. (The work of major roads in the city will be started with a fund of 20 crores. MLA Kishore Jorgewar inspected the roads dug for sewerage.)

Vidyanshnewslive
By -
0
20 कोटींच्या निधीतून सुरू होणार शहरातील प्रमुख मार्गांचे काम. सीवरेजसाठी खोदलेल्या रस्त्यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी. (The work of major roads in the city will be started with a fund of 20 crores. MLA Kishore Jorgewar inspected the roads dug for sewerage.)


चंद्रपूर :- शहरातील सीवरेज लाईनच्या कामामुळे अनेक रस्ते खोदण्यात आले आहेत. परिणामी नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज शनिवारी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंजूर 20 कोटी रुपयांच्या निधीतून त्वरित रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याचे निर्देश दिले. यावेळी मनपाचे शहर अभियंता विजय बोरिकर, शाखा अभियंता अविनाश भारती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्रीकांत भट्टड यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी महानगर शहर अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, अमोल शेंडे, सलिम शेख, करण नायर, करणसिंग बैस, स्वप्निल पटकोटवार, सुमित बेले, चंद्रराज बातो आदींची उपस्थिती होती. सीवरेजसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे नागरिकांसाठी मोठे संकट बनले आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती पाहता आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्य मार्गांची पाहणी केली. सीवरेजचे काम पूर्ण होताच तातडीने रस्त्यांची पुनर्बांधणी सुरू करावी. चैत्र नवरात्र यात्रा 3 एप्रिलपासून सुरू होत आहे, त्यामुळे या यात्रेपूर्वी जटपूरा गेट ते जटपूरा गेट हा प्रमुख मार्ग संपूर्णतः तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
          शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी नगर विकास निधी अंतर्गत 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, सीवरेज लाईनच्या कामामुळे रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याने पुनर्बांधणी थांबवण्यात आली होती. आता शहरात सिवरेजचे काम पूर्ण होत असल्याने तातडीने दुरुस्तीला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय साधत कामे वेगाने पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. यापूर्वीही आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सीवरेजच्या कामामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली होती. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत, कामे लवकर पूर्ण करून रस्त्यांची पुनर्बांधणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. विशेषतः शहरातील मुख्य मार्गांचे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय बैठकीत झाला होता. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राथमिक टप्प्यात सर्वाधिक रहदारी असलेल्या मार्गांचे काम करण्यात येणार आहे. चैत्र नवरात्र यात्रा सुरू होण्यापूर्वी यात्रेकरूंना आणि स्थानिक नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जटपूरा गेट ते जटपूरा गेट हा मार्ग तयार करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहेत. यात्रेच्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी मनपा प्रशासनाने सिवरेजचे उर्वरित काम वेगाने करावे, असे आदेश त्यांनी दिले. सीवरेजचे काम पूर्ण होताच गांधी चौक ते पठाणपुरा, आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट यासह इतर दोन प्रमुख मार्गांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, ज्या भागात सिवरेजचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी रस्त्यांचे डागडुजी करण्याच्याही सूचनाही त्यांनी दिल्या.नागरिकांना वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांपासून लवकरच दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने त्वरीत पावले उचलावीत असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)