गोंडवाना विद्यापीठातर्फे 26 व्या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन, राज्यात खेळाचे उत्कृष्ट केंद्र चंद्रपुरात बनविण्यासाठी प्रयत्न करणार - क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे (Inauguration of 26th Inter University Sports Festival by Gondwana University, efforts will be made to make Chandrapur an excellent center of sports in the state - Minister of State for Sports Raksha Khadse)

Vidyanshnewslive
By -
0
गोंडवाना विद्यापीठातर्फे 26 व्या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन, राज्यात खेळाचे उत्कृष्ट केंद्र चंद्रपुरात बनविण्यासाठी प्रयत्न करणार - क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे (Inauguration of 26th Inter University Sports Festival by Gondwana University, efforts will be made to make Chandrapur an excellent center of sports in the state - Minister of State for Sports Raksha Khadse)


चंद्रपूर :- राज्याच्या टोकावर असलेले चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांबद्दल काहीतरी वेगळेच ऐकायला येते. मात्र येथे आल्यावर जाणवते की, विकासाच्या क्षेत्रात हा भाग राज्याच्या इतर भागापेक्षा कितीतरी पुढे आहे. क्रीडा क्षेत्राच्या सोयीसुविधा सुद्धा येथे अतिशय चांगल्या आहेत. त्यामुळे राज्यात चंद्रपूर हे खेळाचे उत्कृष्ट केंद्र करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या वतीने विसापूर येथील क्रीडा संकुल येथे आयोजित 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू श्रीराम कावळै, कुलसचिव डॉ. अनिल विरेखण, डॉ. श्याम खंडारे, अनिता लोखंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते. या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निमंत्रणावरून चंद्रपूर येथे पहिल्यांदाच येण्याचा योग आला, असे सांगून क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या युगात मैदानी खेळ, खेळणे आवश्यक आहे. मोबाईलच्या जगातून बाहेर निघून विद्यार्थी, तरुण-तरुणी आणि नागरिकांनी रोज किमान दोन तास रोज खेळावे. खेळामुळे आपले शारीरिक आणि मानसिक उत्कृष्ट राहण्यास मदत होते. 2036 मध्ये होणा-या ऑलंपिक स्पर्धेत चंद्रपूर आणि गडचिरोली या भागातील खेळाडू ऑलिंपिक मध्ये खेळावे, असा प्रयत्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा आहे. त्यासाठी क्रीडा राज्यमंत्री म्हणून नक्कीच प्रयत्न केला जाईल. तरुणांनी क्रीडा हे क्षेत्र करियर साठी निवडावे. या महोत्सवात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, अ‍ॅथलेटिक्स व बुद्धिबळ असे 8 क्रीडा प्रकार समाविष्ट आहेत.


              क्रीडा महोत्सवाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, हा उपक्रम सरकारच्या क्रीडा धोरणाला ग्रामीण आणि शहरी पातळीवर प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे. तसेच भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी केंद्र सरकार अशा क्रीडा उपक्रमांना भक्कम पाठिंबा देण्यास कटिबद्ध आहे. हा महोत्सव केवळ खेळांसाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांना एकत्रित आणून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्याचा एक अनोखा उपक्रम ठरणार आहे, असेही केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले. प्रास्ताविकात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू श्रीराम कावळे म्हणाले, राज्यातील विविध विद्यापीठामधून जवळपास 3500 खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक असे एकूण 4 हजार नागरिक येथे आले आहेत. चंद्रपूर - गडचिरोली ही व्याघ्र भुमी आहे. या भुमीत सर्व खेळाडूंचे मी विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. तत्पुर्वी खेळाडूंनी पथसंचलनातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. क्रीडा ज्योत प्रज्वलन आणि खेल भावना शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे संचालन शिल्पा आठवले यांनी तर आभार कुलसचिव डॉ. अनिल विरेखण यांनी मानले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)