चंद्रपूर :- मनातील इच्छाशक्तीसमोर कोणतीही मर्यादा मोठी नसते, हे दिव्यांग बांधवांनी आपल्या सादरीकरणातून सिद्ध केले आहे. चंद्रपूर पर्पल उत्सवामध्ये दिव्यांग बांधव आपल्या कौशल्याचा आणि कलेचा उत्कृष्ट आविष्कार सादर करीत आहेत.हा कार्यक्रम केवळ एक उत्सव नाही, तर दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनाचा आणि त्यांच्या सामर्थ्याचा महाउत्सव आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. चंद्रपूर महानगरपालिका, दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपरपर सोसायटी आणि पूनम प्रोडक्शन यांच्या वतीने प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात पर्पल उत्सव अंतर्गत दिव्यांग कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार जोरगेवार बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे, उपायुक्त मंगेश खवले, मनपा समाज कल्याण अधिकारी सचिन माकोडे, पास्टर डॉ. रामेशकुमार बोरकुटे, प्रा जयश्री कापसे - गावंडे, अमोल शेंडे, निलेश पाझारे, कल्पना शिंदे, रमेश पुलीपाका, कार्तिक बुरेवार, सुरेंद्र अंचल, शुशांत नागराळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, दिव्यांग बांधव हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे या बांधवांना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांसाठी 'अम्मा की दुकान' उपक्रमाअंतर्गत दुकान उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या गरजांनुसार उपयुक्त साहित्याचे वाटप करणे या गोष्टी सातत्याने केल्या जात आहेत. चंद्रपूर पर्पल उत्सवाच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांच्या कला आणि सांस्कृतिक कौशल्यांचा विकास होत असून, हा उत्सव खरोखरच प्रेरणादायक आहे. आपल्या संविधानाने दिलेल्या समान हक्कांची शिकवण आजच्या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवत आहे. जिद्द, आत्मविश्वास आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर कोणतेही आव्हान पार करता येते, हे दिव्यांग बांधवांकडून शिकायला मिळते. दिव्यांग बांधवांसाठी केवळ सहानुभूती दाखवणे पुरेसे नाही, तर त्यांच्या गरजांसाठी योग्य सुविधा निर्माण करणे, त्यांना सन्मानाने समाजात स्थान मिळवून देणे, आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी यांनी यावेळी सांगितले.आजचा कार्यक्रम हा सर्वसमावेशक समाज उभारणीच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. या व्यासपीठावर सादर होणाऱ्या कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपल्याला केवळ मनोरंजनच नव्हे, तर प्रेरणादायी संदेशही मिळत असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला दिव्यांग बांधव आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या