चंद्रपूर : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने, नागरिकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) व व्हीव्हीपॅट वापराबाबत चित्ररथाद्वारे जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर मोहीम चंद्रपूर जिल्ह्यात 10 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात येणार असून या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, नगर प्रशासन अधिकारी विद्या गायकवाड, नायब तहसीलदार( निवडणूक) तुषार मोहुर्ले, प्रभाकर गिज्जेवार, आशिष बाचमपल्लीवार, गौरव निखारे तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता वापरण्यात येणारी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची जनजागृती मोहीम जिल्ह्यातील 2076 मतदान केंद्रातील 1280 ठिकाणी तसेच प्रत्येक शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, गाव आणि शहरातील मुख्य चौक, बाजार नाका, शासकीय कार्यालये, सभेची ठिकाणे आदी मोक्याच्या ठिकाणी फिरत्या वाहनाद्वारे जनजागृती करण्यात येत असून या मोहिमेमध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, मतदारांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या जनजागृती मोहिमेमध्ये मतदान प्रक्रियेसंबंधी माहिती जाणून घ्यावी. मतदान यंत्राबाबत आवश्यक माहिती, प्रत्यक्ष मतदान करणे, आपण केलेल्या मतदानाप्रमाणेच निकाल येतो का ते पाहणे, त्यात काही शंका असल्यास त्याचे निरसन करणे तसेच व्हीव्हीपॅटबाबत माहिती करून घेणे यासाठी सदर मोहीम सुरू असणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारापर्यंत ही जनजागृती मोहीम पोहोचेल, अशी व्यवस्था जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सर्व मतदारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो.9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या