जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ(Eye donation fortnight launched at District General Hospital)

Vidyanshnewslive
By -
0
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नेत्रदान पंधरवड्याचा शुभारंभ(Eye donation fortnight launched at District General Hospital)


चंद्रपूर :- जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे 39 व्या नेत्रदान पंधरवाडयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनारकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. तारासिंग आडे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. उल्हास सरोदे, डॉ. जिनी पटेल, नोडल अधिकारी विवेक मसराम, मेट्रन श्रीमती आत्राम, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. बोरकर, डॉ. सावलीकर आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणा डॉ. चिंचोळे म्हणाले, जिवंतपणी रक्तदान, किडनी दान, लिव्हर दान तर जाता- जाता अवयवदान आणि नेत्रदानाकरीता निर्सगाने खास सोय केलेली आहे. मृत्युनंतर फक्त नेत्रदान करू शकतो. नेत्रदान केल्यानंतर मृत्युपश्चातही दुसऱ्याच्या जिवनात आनंद देण्याचे कार्य करता येते. नेत्रदान केल्याने दोन जिवंत अंध व्यक्तींना दृष्टिप्रदान होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
           डॉ. सोनारकर म्हणाले, नेत्रदानाकरीता समाजात जागृती होणे हे आवश्यक आहे. ज्या कुटूंबातील व्यक्ती मृत्यु पावतो ते कुटुंब दु:खात असते, अशा वेळेत समाजातील जागृत नागरिकांनी त्या कुटुंबातील नातेवाईकांसोबत संवाद साधून नेत्र दानाचे महत्व पटवून द्यावे व नेत्रदान करण्यासाठी प्रवृत्त करावे. डॉ. बंडू रामटेके यांनी कोणतेही दान हे सर्वश्रेष्ठच आहे, परंतु नेत्रदान हे दृष्टिहिन रुग्णाच्या जिवनात आनंद निमार्ण करू शकतो म्हणून नेत्रदान केले पाहिजे, असे आवाहन केले. प्रास्ताविकात नेत्रशल्य चिकित्सक डॉ. उल्हास सरोदे म्हणाले, भारतात 1 कोटी 40 लाख अंध आहेत. त्यामध्ये 10 लाख रुग्ण बुब्बुळाच्या आजाराने अंध आहेत, यात दरवर्षी रुग्णांची संख्या वाढत आहे. नातेवाईकांच्या परवानगीने नेत्रदान करता येतो. याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे संपर्क साधावा व डॉक्टरांची टिम येईपर्यंत रुग्णाच्या पापण्या झाकून ठेवाव्या, डोळयावर थंड पाण्याचा कपडा ठेवावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन नेत्रचिकित्सा अधिकारी निशा चांदेकर यांनी तर आभार नेत्रदान समुपदेशक योगेंद्र इंदोरकर यांनी मानले. कार्यक्रमाला सामाजिक संस्थेमध्ये नेत्रदानाकरीता प्रत्यक्ष मदत करणारे, बढते कदमचे सदस्य सुरेश हरीरामणी, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सदस्य प्रदिप अडकिणे, रोटरी क्लॅबचे गमेश दोशी, गुरुमाऊली अध्यात्मिक मंडळ, एनसीडी कार्यक्रम व नेत्रविभागातील अधिकारी व कर्मचारी, नर्सिंग स्कुलचे विद्यार्थी व रुग्ण उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)