मतदार याद्या प्रसिध्द, नागरिकांनी आपले नाव तपासण्याचे आवाहन, स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरामध्येही वाढ, प्रशासनाच्या विशेष मोहिमेतून जिल्ह्यात 38637 मतदारांची वाढ - जिल्हाधिकारी विनय गौडा (Voter lists popular, citizens urged to check their names, increase in male-female sex ratio, increase of 38637 voters in district through special campaign of administration - Collector Vinay Gowda)

Vidyanshnewslive
By -
0
मतदार याद्या प्रसिध्द, नागरिकांनी आपले नाव तपासण्याचे आवाहन, स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तरामध्येही वाढ, प्रशासनाच्या विशेष मोहिमेतून जिल्ह्यात 38637 मतदारांची वाढ - जिल्हाधिकारी विनय गौडा (Voter lists q, citizens urged to check their names, increase in male-female sex ratio, increase of 38637 voters in district through special campaign of administration - Collector Vinay Gowda)


चंद्रपूर :- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. यात प्रामुख्याने नवमतदारांची नोंदणी, मयत किंवा स्थलांतरीत मतदारांचे नाव वगळणे, मतदार यादीत त्रृटी असल्यास त्यात दुरुस्ती करणे आदींचा समावेश होता. याची फलश्रृती म्हणून जिल्ह्यात तब्बल 38637 मतदारांची वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यात आता 1000 पुरुष मतदारांमागे 965 स्त्री मतदार असून लिंग गुणोत्तर 9 ने वाढल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्दीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते. पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, 1 जुलै 2024 च्या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादी 30 ऑगस्ट 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच https://chanda.nic.in या संकेतस्थळावर नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, ते लगेच तपासावे, जेणेकरून कोणीही मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. तसेच निवडणुकीची घोषणा होईपर्यंत नाव नोंदणी किंवा नाव वगळणे ही प्रक्रिया सुरू राहते. त्यामुळे नागरिकांनी वेळात वेळ काढून संबंधित ठिकाणी जावून आपले नाव तपासावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात 38637 मतदारांची वाढ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात एकूण 17 लक्ष 92 हजार 147 मतदार होते. यात आता 51125 मतदारांची नव्याने नोंदणी झाली असून 12488 नावे मयत किंवा स्थलांतरीत झाल्यामुळे वगळण्यात आली आहे. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यात 38637 मतदारांची वाढ झाली असून जिल्ह्यात आता एकूण 18 लक्ष 30 हजार 784 मतदार आहेत. यात 9 लक्ष 31 हजार 821 पुरुष मतदार, 8 लक्ष 98 हजार 918 स्त्री मतदार तर 45 इतर मतदारांचा समावेश आहे.
   

  
        18 ते 19 वयोगटातील 33825 युवा मतदार जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 10488 ने वाढली असून जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघ मिळून 33825 युवा मतदार आहेत. यात 18801 पुरुष, 15022 स्त्री आणि 2 इतर मतदार यांचा समावेश आहे. मतदान केंद्रांची संख्या, 85 वर्षांवरील मतदार तसेच दिव्यांग मतदार : जिल्ह्यात एकूण 2076 मतदार केंद्र असून राजूरा विधानसभा मतदार संघात – 344, चंद्रपूर – 390, बल्लारपूर – 366, ब्रम्हपूरी – 319, चिमूर – 314 आणि वरोरा विधानसभा मतदार संघात 343 मतदान केंद्र आहेत. तसेच जिल्ह्यात 85 वय आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 13987 आहे. तर दिव्यांग मतदार एकूण 8496 आहेत. मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा व देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला सहभाग नोंदविता यावा, यासाठी सर्व मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी. यासाठी मतदार यादी सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच https://chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागास प्रत्यक्ष भेट देऊन किंवा व्होटर्स हेल्पलाईन ॲप अथवा www.voters.eci.gov.in या वेब पोर्टलद्वारे अर्ज नमुना क्रमांक 6 भरून आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)