नागपूर : प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) या पदाचा अतिरिक्त कार्यभार बुधवारी शोमिता विश्वास यांनी मावळते वन बलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांच्याकडून येथे स्वीकारला. शोमिता विश्वास या १९८८ च्या तुकडीतील भारतीय वनसेवेच्या अधिकारी आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यापाठोपाठ वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वास यांचे अभिनंदन केले आहे. राज्यासाठी ही गौरवाची बाब असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी विश्वास यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महा कॅम्पा, नागपूर पदावर काम केले आहे. राज्य आणि केंद्राशी कार्यक्षमतेने समन्वय साधत त्यांनी कॅम्पा योजना राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबविलेली आहे. त्यांनी केंद्र सरकारमध्ये आयुष मंत्रालयातील राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी व शेतकरी कल्याण सहसचिव पदावर काम केले आहे. मावळते वनबलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांच्या निरोप समारंभात सर्वश्री महिप गुप्ता, श्रीनिवास राव, कल्याणकुमार, नरेश झुरमुरे यांच्यासह सर्व वरिष्ठ वनअधिकारी व वनखात्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या