आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास मग, सी-व्हिजिल ॲपवर तक्रार करा अवघ्या 100 मिनिटाच्या आत मिळेल प्रतिसाद, भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप (In case of violation of code of conduct, report on C-Vigil app, get response within 100 minutes, Election Commission of India developed mobile app)

Vidyanshnewslive
By -
0
आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास मग, सी-व्हिजिल ॲपवर तक्रार करा अवघ्या 100 मिनिटाच्या आत मिळेल प्रतिसाद, भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप (In case of violation of code of conduct, report on C-Vigil app, get response within 100 minutes, Election Commission of India developed mobile app)
चंद्रपूर :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी 16 मार्च 2024 पासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी - व्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करू नये, याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काही वेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी - व्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.
           सी - व्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आय.ओ.एस. डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशील, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे. वैशिष्ट्य  सी- व्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो. वापर कसा करायचा एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे. त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.
        अचूक कृती व देखरेख या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते. लाईव्ह फोटो, व्हिडिओ या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल. तातडीने होते कारवाई या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल. डाटा सुरक्षा या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड ठेवला जातो.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)