15 ऑगस्ट आणि वामनदादा कर्डक जन्मदिवस 15th August and Vamandada Kardak Birthday

Vidyanshnewslive
By -
0

15 ऑगस्ट आणि लोककवी वामनदादा कर्डक जन्मदिवस 15th August and folk poet Vamandada Kardak's birthday

वृत्तसेवा :- आज 15 ऑगस्ट 2023 भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा स्वातंत्र्यदिन सर्व देशभर साजरा होत आहे, परंतु हा दिवस एका महाकवीचा जन्मदिवसही आहे. ह्या जाणिवेने मी कृतज्ञ होतो. आंबेडकरोत्तर समतेच्या लढाईतील सांस्कृतिक पातळीवर आपल्या झुंझार लेखणीने ज्याने चळवळीचे अवघे जग "आंबेडकरमय" केले, तो म्हणजे कवीरत्न वामनदादा कर्डक यांचा आज जयंती दिवस. 

 "उद्धरली कोटी कुळे,भीमा तुझ्या जन्मामुळे"

हे लोकगायक श्रावणदादा यशवंते यांच्या मधुर आवाजात ध्वनीमुद्रित झालेल्या या भीमगीताचे कवी वामनदादा कर्डक होत. वामन तबाजी कर्डक असे मूळ नाव असलेले आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील देशवंडी गावचे हे कवी घरच्या गरीब परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकले नाही. परंतु किमान अक्षर ओळख झाल्यानंतर काव्यरचना करू लागले. पाहता पाहता अनेक विषयांवरची किमान पाच हजारावर गाणी त्यांनी लिहिली असून त्यांच्या शेकडो ध्वनीमुद्रिका उपलब्ध आहेत. जीवनातील अनेक पैलूंवर वामनदादांची लेखणी प्रकाशझोत टाकते. "वाटचाल" आणि "मोहोळ" हे त्यांच्या गीतांचे संग्रह प्रकाशित झाले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या रचनांवर Phd आणि MPhil साठी संशोधन झाले आहे.

"केस माझे हे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले"

       ही जीवनविषयक जाणीव ते सहजच आपल्या काव्यातून व्यक्त करतात तसेच माझ्या भिमाईचा लळा, जसा मामाचा मळा" अशी आंबेडकर माऊलीबद्दलची उद्दात्त भावना ते त्यांच्या काव्यातून प्रकटते. शिवाय "तुझीच कमाई आहे गं भिमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही" अशी बाबासाहेबांप्रती त्यांची निष्ठा अधोरेखित होते. सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विषमतेवर त्यांची लेखणी कडाडून हल्ला करते. त्यांचे एक प्रसिद्ध गाणं आहे....

"सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठं हाय हो ? सांगा धनाचा साठा अन् आमचा वाटा कुठं हाय हो ?

    व्यवस्थेची चिरफाड करण्याचा वामनदादांच्या लेखणीचा आणि प्रतिभेचा आवाका शब्दातीतच आहे. 15 ऑगस्ट या कवीरत्न वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना क्रांतिकारी अभिवादन...!

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)