चंद्रपुरात नेमके काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोण ? प्रकाश देवतळे व आमदार सुभाष धोटे यांचे दावे, प्रतिदावे (Who exactly is the rural district president of Congress in Chandrapur? Claims, counter claims of Prakash Devtale and MLA Subhash Dhote)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपुरात नेमके काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोण ? प्रकाश देवतळे व आमदार सुभाष धोटे यांचे दावे, प्रतिदावे (Who exactly is the rural district president of Congress in Chandrapur?  Claims, counter claims of Prakash Devtale and MLA Subhash Dhote)

चंद्रपूर :- जिल्हा काँग्रेस समितीचा (ग्रामीण) प्रभारी जिल्हाध्यक्ष मीच असा दावा प्रकाश देवतळे व आमदार सुभाष धोटे या दोघांनी केल्याने काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष पदावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान प्रदेश काँग्रेस समितीने ग्रामीण काँग्रेसचे अधिकृत प्रभारी जिल्हाध्यक्ष राजुराचे आमदार सुभाष धोटे हेच आहेत असे स्पष्ट केले आहे. तरीही देवतळे यांनी मीच प्रभारी जिल्हाध्यक्ष असा पाढा माध्यमांकडे वाचण्यास सुरूवात केल्याने काँग्रेस पक्षातील विसंवाद दिसून येत आहे. दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यमुक्तीच्या आदेशाला स्थगिती दिल्याचा दावा कार्यमुक्त जिल्हाध्यक्ष देवतळे यांनी केला आहे. यासंदर्भात अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून आपल्याला स्थगितीचे पत्र देखील मिळाले आहे असे देवतळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. पक्षाने कार्यमुक्तीला स्थगिती दिल्याने जिल्हाध्यक्ष मीच आहे असाही दावाही देवतळे यांनी केला. देवतळे यांना पत्राची प्रत मागितली असता व्हॉट्ॲपवर पाठवितो असे सांगितले. मात्र प्रत पाठविली नाही. एप्रिल महिन्यात झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा जिल्हाध्यक्षाशी हातमिळवणी करून स्वतंत्र पॅनल उभे केले. 

        निवडणुक निकालानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी एकत्र आनंदोत्सव साजरा करित गुलाल उधळीत ढोल ताशाच्या तालावर नृत्य केले होते. देवतळेंचा भाजप जिल्हाध्यक्षांसोबतचा नृत्याविष्कार बघून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून तत्काळ कार्यमुक्त केले. त्यानंतर लगेच राजुराचे आमदार सुभाष धोटे यांची चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली. प्रकाश देवतळे सलग नऊ वर्षे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. देवतळे माजी मंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार गटाचे आहेत. वडेट्टीवार यांच्या आशिर्वादामुळेच देवतळे सलग नऊ वर्षे जिल्हाध्यक्ष होते. आता प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी राजुराचे आमदार धोटे यांच्या नियुक्तीनंतर पुन्हा देवतळे प्रभारी जिल्हाध्यक्ष पदासाठी हालचाली करित आहेत. याला कुठेतरी माजी मंत्री आमदार वडेट्टीवार यांचा आशिर्वाद आहे. त्यामुळे आमदार धोटे कमालीचे अस्वस्थ झाले आहे. अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण आपल्याला जमत नाही, देवतळे यांना जिल्हाध्यक्ष राहायचे आहेत तर खुशाल राहावे, माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पेरणे योग्य नाही, प्रदेशाध्यक्षांच्या व्हीडीओ कॉन्फरसिंग बैठकीला आपण उपस्थित होतो. जिल्हाध्यक्ष म्हणून देवतळे उपस्थित होते का असाही प्रश्न धोटे यांनी केला. देवतळेंच्या अशा वक्तव्यामुळे पक्षाची नाहक बदनामी होत आहे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा मतदारांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे असेही धोटे म्हणाले. आमदार सुभाष धोटे यांचेशी संपर्क साधला असता चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीचा प्रभारी जिल्हाध्यक्ष मीच आहे असा दावा त्यांनी केला. आपण सध्या मुंबईत आहे. प्रदेशाध्यक्ष आतापर्यंत सोबत होते. देवतळे यांच्यासंदर्भातील बातम्या प्रकाशित झाल्यानंतर त्यांना विचारणा केली तेव्हा प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी प्रभारी जिल्हाध्यक्ष तुम्हीच आहात अशी माहिती दिल्यचे आमदार धोटे यांनी सांगितले. यासंदर्भात प्रदेश काँग्रेस समितीचे संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांना विचारणा केली असता, आमदार सुभाष धोटे हेच प्रभारी जिल्हाध्यक्ष आहेत असे सांगितले. प्रकाश देवतळे यांच्या कार्यमुक्तीला स्थगिती दिली नाही तर कार्यमुक्ती होल्ड करून ठेवण्यास सांगितले होते. मात्र याच दरम्यान जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार धोटे यांच्याकडे सोपविण्यात आला. सध्या धोटे हेच ग्रामीण अध्यक्ष आहेत. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत बोलणे झाले आहे. त्यांनी देखील धोटे हेच प्रभारी अध्यक्ष असल्याचे सांगितल्याची माहिती पवार यांनी दिली. त्यामुळे आता प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाबाबत कुठलाही वाद नाही असेही ते म्हणाले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)