वर्धा हादरलं ! प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना पत्र लिहून एमपीएससी परीक्षेतील अपयशी विद्यार्थ्याची आत्महत्या

Vidyanshnewslive
By -
0

वर्धा हादरलं ! प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना पत्र लिहून एमपीएससी परीक्षेतील अपयशी विद्यार्थ्याची आत्महत्या 

वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील नागझरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या परिचारकाने कार्यालयातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे, आत्महत्येपूर्वी या तरुणाने 'एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात अपयश आले. आई-वडिलांनी शेती विकून माझ्या शिक्षणावर खर्च केला पण, अपेक्षित नोकरी मिळत नाही' अशी नोंद मृताच्या सोसाईड नोटमध्ये आढळून आल्याने नैराश्यात आत्महत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन ढगे (वय २९. रा. परभणी) असे मृताचे नाव आहे. किसन ढगे हा नागझरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या सात वर्षांपासून शिपाई पदावर कार्यरत होता. सध्या तो देवळी येथे भाड्याने राहत असल्याचे सांगण्यात आले. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करुन मोठ्या पदावर जाण्याचे त्याचे स्वप्न होते. यासाठी तो सतत अभ्यास करीत होता. दवाखान्यात कार्यरत सुपरवायझरकडून त्याला अभ्यासाकरिता सहकार्य केले जात होते. याआधी त्याची पोलीस उपनिरीक्षक बनण्याची संधी अतिशय कमी गुणाने हुकली. परंतु याच परीक्षेत त्याच्या मित्रांना यश मिळाल्याने किसन दु:खी झाला होता.

     घटनेच्या दिवशी त्याने मित्रांसोबत देवळीत जेवण केले. त्यानंतर नागझरी येथील दवाखान्यात रुजू होताच त्याने फेसबुकवर पोस्ट टाकून नोकरीचा भरती घोटाळा तसंच आरोग्यमंत्री आणि संबंधित मंत्री यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करुन आत्महत्या करीत असल्याचे कळविले. ही फेसबूक पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांनी तातडीने नागझरी गाठली असता तोपर्यंत सर्व संपले होते. किसनने कार्यालयातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाला किसन बाहेर न आल्यामुळे रुममध्ये जाऊन पाहणी केली असता त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कार्यालयात धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुलगाव रुग्णालयात पाठवला. त्यानंतर मृतकाचे पुलगाव रुग्णालयात शवविच्छेदनकरून मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आला आहे. मृत किसन ढगे हा अविवाहित असून एमपीएससीच्या परीक्षेत सातत्याने आलेल्या अपयशामुळे वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईट नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या घरच्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणीही केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)