लॉकडाऊनची दोन वर्षे पूर्ण आपण काय कमावले आणि काय गमावले ! तरीही मानव अपराजित राहिला
बल्लारपूर :- आज २४ मार्च २०२२ रोजी बरोबर याच दिवशी म्हणजे २४ मार्च २०२० रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी देशात लॉक-डाऊनची ऐतिहासिक घोषणा केली होती. या लॉकडाऊनमध्ये “क्या खोया क्या पाया” अशी विचारणा केली तर लाखो निबंध तयार होवू शकतात. लॉक-डाऊन काळावरुन आम्ही काय बोध घेतला हा संशोधनाचा भाग आहे. परंतू या अनुभवानंतर देखील जगात रशिया युक्रेन युध्द तिसर्या महायुध्दाचे बीज पेरत आहेत. जिथे जगाला शांततेची गरज असताना मानवाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. मानवी जिवनाची सुरुवात कधी झाली यावर फार मोठया प्रमाणावर संशोधने झालीत. मानवाच्या विकासाचा डॉर्विनचा उत्क्रांतीवादाचा सिध्दांत आम्ही अभ्यासला. अश्मयुग ते आदीमानवापासून आधुनिक प्रगत मानवापर्यन्तचा इतिहास हा थक्क करणारा असाच आहे. विचार करण्याची क्षमता, आणि हसणारा एकमेव प्राणी म्हणजे माणूस. म्हणून माल्थसच्या सिध्दांतानूसार या पृथ्वीवर मानवी संख्येचे नियत्रंण निसर्गात घडणार्या विविध घटनांनी होत असते. तो म्हणतो की लोकसख्येची चिंता करण्याचे कारण नाही. निसर्गाला जेवढी लोकसंख्या हवी असते, तेवढी तो महामारी, प्रलय, महापूर अशा विविध घटनांमधुन नियंत्रिंत करीत असतो. असे असले तरी पृथ्वीवरच्या माणसाचे अस्तित्व संपले असे कधीही झाले नाही. हजारो, लाखो माणसे महामारीत, युध्दात मारली गेली परंतू मानवाचा विकास आणि विज्ञानाच्या माध्यमातून त्याने केलेली प्रगती ही प्रत्येक युगात, प्रत्येक काळात शक्तिमान ठरलेली आहे, शंभर वर्षापूर्वी म्हणजे १९२० मध्ये देखील अशाच प्रकारचे विषाणू संक्रमण जगावर आले होते. तेव्हा आरोग्य विज्ञान क्षेत्रात फार मोठी प्रगती झालेली नव्हती, तरीही माणसांचे अस्तित्व कायम राहिले. याचा अर्थ मानव हा अद्भूत शक्तिशाली आणि कोणत्याही काळात नष्ट न होणारा प्राणी आहे. म्हणून प्लेगच्या मरीआईची मंदीरे तयार झाली आहेत. तर कोरोना काळात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती झाली. याचा अर्थ विश्वास, श्रध्दा आणि विज्ञान या माध्यमातून कोणत्याही काळात मार्ग काढण्याची शक्ति मानवी मस्तिष्कामध्ये आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. म्हणूनच आयटी क्षेत्राची निर्मिती करणारे ‘वर्क फ्राम होम’च्या माध्यमातून आजही नव्या पध्दतीने काम करत आहेत. तर ‘ऑनलॉईन’च्या संकल्पनेतून आज वेळ, पैसा, इंधन याची मोठया प्रमाणावर बचत होतांना दिसते आहे. म्हणून कोणत्याही संकटात धैर्य सोडणारी माणसे जास्त काळ टिकत नसतात. तर कोणत्याही संकटाला आव्हान म्हणून स्विकारणारे आशेचा किरण शोधून आपला मार्ग शोधुन काढत असतात. म्हणून शाळेची कवाडे का उघडली नाहीत आणि मंदिराची घंटा का वाजली नाही यापेक्षा हवेतून ताबडतोबीने ऑक्सिजन शोषून रुग्णांना पोहचविणारी यंत्रणा मानवाचे श्वास जीवंत ठेवण्यात यशस्वी ठरली. तर शाळेची कवाडे बंद असली तरी ऑनलाईन शिक्षणपध्दतीची निर्मिती यातून झाली. तीचा विकास करुन भविष्यात आम्ही कोणत्याही संकटाशी लढू शकतो एवढी मानसिकता लहान मुलांपासून तर तरुणांपर्यंत झाली हे ही नसे थोडे. प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता असेल तर अशक्य असे काही नाही. सर्व जग आम्ही एकाच जागी थांबवून पाहीलं, संपूर्ण देश कोणतीही गतिविधीशिवाय आम्ही प्रत्यक्षात अनुभवला परंतू या दोन वर्षात आम्ही जे सामाजिक, आर्थिक, मानसिक बदल बघीतले त्यातून आम्ही काही बोध घेणार आहोत का? तर याचे उत्तर काळाच्या उदरात लपलेले आहे. विस्मरणात गेलेला मानव जेव्हा इतिहासाची पाने चाळतो तेव्हा त्याला अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राने जापान सारख्या प्रगत राष्ट्रावर टाकलेला अणूबाँम्ब आठवतो. त्यातुन मित्र राष्ट्रांचे झालेले नुकसान पाहतो. असाच काहीसा प्रकार जागतिक कोरोना संकटातून नुकताच बाहेर पडलेला रशिया आपल्या उन्मत वृत्तीने युक्रेन सारख्या लहानशा राष्ट्रावर हॉयपरसानिक क्षेपणास्त्राचा मारा करतांना दिसतो आहे. जगातील पर्यावरणावर त्याचे परिणाम भविष्यात दिसतीलच, परंतू यदाकदाचित मित्र राष्ट्र या युध्दात उतरलेच आणि तिसर्या महायुध्दाचे बिगुल येणार्या काळात वाजलेत तरी जापानच्या हिरोशिमा व नागासाकी प्रमाणे जगातील अपराजित माणूस पुन्हा नव्या आयुष्यांसाठी फिनिक्स पक्षापक्षाप्रमाणे ‘उडान’ भरेल यात शंका नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या मागील दोन वर्षात डोकाऊन पाहतांना व विश्लेषण करतांना ‘आत्मविश्वास’ किती महत्वपूर्ण असतो याची जाणिव होते. म्हणून “इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना” हे गीत कायम ओठावंर राहू द्या. एवढेच यानिमित्ताने सांगता येईल.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो.9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या