वृत्तसेवा :- 'नालंदा' एक प्राचीन नगर बिहार प्रांतात पाटण्यापासून चाळीस मैल अंतरावर आग्नेय दिशेला वसलेले होते. 'नालंदा' भगवान बुद्धाच्या काळात एक समृद्ध व संपन्न नगर होते. भगवान बुद्ध तेथे अनेक वेळा गेलेले होते व तेथे त्यांनी वास्तव्य केलेल होते. बुद्ध धर्मानुयायांची संख्या नालंदामध्ये मोठ्या प्रमाणात होती आणि भगवान बुद्धांवर त्यांची अपार श्रद्धा होती. नालंदा येथील प्रवारीक नावाचा एक धनीसेठ याने भगवान बुद्धाला प्रवारीक भवन दान केले होते. भगवान बुद्ध येथे कधी-कधी वास्तव्य करीत असत. नालंदा हे जैन धर्मियांचेही केंद्र होते. एकदा तीर्थंकर महावीर आणि भगवान बुद्ध हे दोघेही एकाच वेळी नालंदा येथे वास्तव्य करण्यास थांबलेले होते. महावीरांनी येथे चौदा चातुर्मास वास्तव्य केलेले होते असे जैन परंपरा सांगते. भगवान बुद्धाचे प्रमुख शिष्य 'सारिपुत्र' यांचे कपिलनाक हे जन्मस्थानही नालंदा येथूनच जवळच आहे असे म्हणतात की, सारिपुत्र येथे आपल्या ऐंशीहजार भिक्षूसह राहत होते. भगवान बुद्धाचे दुसरे प्रमुख शिष्य 'महामोग्गलान' यांचे कोलीत हे जन्मस्थान नालंदापासून जवळच आहे. नालंदा येथे पूर्वी एक आमराई होती. ती पाचशे व्यापाऱ्यांनी दहा लाख सुवर्ण नाणी देवून विकत घेतली आणि तथागतांना अर्पण केली. तथागतांनी येथे तीन महिने धम्मज्ञान दिले होते. त्यामुळे त्या व्यापाऱ्यांना आणि इतरांना अर्हतपद प्राप्त झाले. अशाप्रकारे प्राचीन परंपरा असलेल्या या ठिकाणाला 'नालंदा' नाव कसे पडले? याबाबत विविध मते दिसून येतात.
'नालंदा' नाव कसे पडले? ह्यु-एन-त्संग या चीनी यात्रेकरुने आपल्या प्रवास वर्णनात नालंदाबद्दल लिहिले आहे की, या ठिकाणी पूर्वी एक आम्रवन होते. त्यामध्ये एक विशाल पाण्याचा तलाव होता. त्यात एक नालंदा नावाचा नाग राहत होता म्हणून त्या ठिकाणाला नालंदा असे नाव पडले. 'नालंदा' नावाविषयी आणखीही एक आख्यायिका रुढ आहे. तथागत पूर्व एकेकाळी या प्रदेशात बोधिसत्वाचे जीवन व्यतित करीत असतांना या भागातील एका मोठ्या राजाचा अधिपती बनला व त्याने आपली राजधानी या जागेवर स्थापन केली. भूतमात्रांसंबधी दयेने प्रेरीत होवून तो त्यांना नेहमी सहाय्य करी. या सदगुणामुळे त्याला अविरत दान असे म्हणत. तो जे किंवा जेवढे देईल ते त्याला कधीच पुरेसे वाटत नसे. म्हणून नालंदा हा शब्द 'न अलम् दा' ('न'म्हणजे 'नाही', 'अलम्' म्हणजे 'पुरे' आणि 'दा' म्हणजे 'देणे' याचा मिळून बनलेला आहे. हे दानात खंड न पडणारे ठिकाण असल्यामुळे याला 'नालंदा' असे नाव पडले.
भगवान बुद्धाच्या काळापासून प्राचीन परंपरा लाभलेली असल्यामुळे नालंदाचा विकास प्रदीर्घ काळात होत गेला. त्यामुळे नालंदाच्या स्थापनेबाबत विविध विचार प्रवाह दिसून येतात. तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर काही वर्षांनी शक्रादित्य नावाचा एक राजा या देशात होवून गेला. तो त्रिरत्नांचा फार आदर करीत असे. त्याचे आचरण तथागतांच्या धम्माप्रमाणे असे. शुभ लक्षणांनी युक्त अशा या जागेची निवड करुन त्याने येथे एक संघाराम बांधला. संघारामाच्या पाया खोदणीचे काम चालू असताना एका नागाला दुखापत झाली. त्यावेळी तेथे निर्ग्रथाचा एक प्रख्यात ज्योतिषी उपस्थित होता. त्याने नालंदा विषयी खालील भविष्य लिहून ठेवले होते. 'ही जागा अत्युत्तम आहे. या ठिकाणी जर संघाराम बांधला, तर निश्चितच तो फार प्रख्यात होईल. सर्व जम्बुद्वीपात तो एक आदर्श संघाराम होईल. एक हजार वर्षापर्यंत त्याची भरभराट हाईल. विद्यार्थ्यांना येथे सर्व प्रकारचे शिक्षण मिळेल. परंतु या नागाला जखम झाल्यामुळे बऱ्याच लोकांचा येथे रक्तपात होईल. भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, त्यांचे प्रमुख शिष्य सारिपुत्र आणि महामोग्गलान यांची जन्मभुमी असल्याकारणाने बौद्ध भिक्षुकरीता नालंदाची महत्ता अधिक होती. ज्याने भगवंताच्या धम्मचक्राचे प्रवर्तन करण्याकरीता आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्या सम्राट अशोकाने नालंदामध्ये प्रथम विहारची स्थापना केली. ह्युएनत्संग- यांच्या प्रवासवर्णनावरुन काही काळानंतर 'शंकर' आणि 'मुग्दलगोमि' नामक दोन ब्राह्मणांनी या विहाराला विशाल बनविले असे म्हटले जाते की, आचार्य नागार्जुन यांनी येथे शंकर ब्राह्मणाकडून शास्त्रार्थ ज्ञान प्राप्त केले.
नागार्जुन व त्यांचे शिष्य दोघेही नालंदामध्येच राहत होते. उच्चतम प्राचीन परंपरा लाभलेली असल्यामुळे आणि नगर विकासाला येथे वाव असल्यामुळे बौद्ध आचार्य नागार्जुन यांनी आपला शिष्य आर्यदेव याला नालंदा येथे विहार बांधण्याची आज्ञा केली. आर्यदेवाने इ.स.४ थ्या अखेरीस इथे विहाराची उभारणी करुन मोजक्या शिष्यासह 'बौद्ध दर्शन' आणि 'साधना पद्धती' यांच्या अध्ययन-अध्यापनास प्रारंभकेला. आर्यदेवाने लावलेले रोपटे पुढील दोन-तीन शतकात फुला-फळांनी बहरले. सातव्या शतकात ह्यु-एन-त्संग जेव्हा येथे आला तेव्हा नालंदा विहाराच्या वैभवाने त्यांचे डोळे दिपले. या विहाराची जागा प्रशस्त होती. विद्यापीठ विहाराच्या जागेत होते. इथे एक विशाल उद्यान होते. त्यामध्ये सदैव फुला-फळांनी बहरलेल्या वृक्ष-वेली होत्या. उद्यानात अनेक जलाशये आणि जलप्रवाह होते. त्या जलाशयात विविध रंगाची कमळे फुललेली असत. अशा रमणीय वातावरणात इथे अध्ययन-अध्यापनाचे कार्य चालत असे. उत्तुंग संघारामची निर्मिती ह्यु-एन-त्संगने या संघारामाचे मोठ्या प्रसन्नतेने वर्णन केले आहे. पद्धतशीर रीतीने बांधलेले उंच उंच मनोरे, अनेक मंडळ व प्रासाद व ज्यांची शिखरे जणु अभ्रमंडळ भेदून वर गेली आहेत. अशी विहारे सर्वच मोठे सुंदर दिसे. या विहाराभोवती एक नीलवर्ण जलप्रवाह वाहत असून त्याची शोभा त्यातील नीलोत्पलांनी अधिकच वृद्धिंगत केली होती. विहारामध्ये तेजस्वी सुवर्ण-पुष्पांच्या भारांनी वाकलेले कर्णिकार वृक्ष होते. तर बाहेर आम्रवृक्षवाटिकांच्या दाट छायेने भिक्षूची निवासस्थाने आच्छदिलेली होती. संघारामात आठ मोठमोठाले भव्य चौक होते. निरनिराळ्या चौकात भिक्षूना राहण्यासाठी बांधलेल्या अनेक चार मजली इमारती होत्या. "भारतातील संघारामाची संख्या आजही हजारोंनी मोजता येईल. परंतु विस्तार, भव्यता, उंची व श्रीमंती याबाबतीत येथील संघारामाची सर दुसऱ्या कोणत्याही संघारामाला येणार नाही. संधारामात राहणाऱ्या व बाहेरुन येणाऱ्या भिक्खूंची संख्या नेहमी दहा हजारापर्यंत असते, आणि हे सर्व भिक्खू महायान पंथी आहेत अठरा पंथांचे अनुयायी येथे एकत्रित झाले आहेत. येथे सामान्य ग्रंथापासून वेद व तत्सम अन्य ग्रंथ, त्याचप्रमाणे वैद्यकीय ग्रंथ, गुहय शास्त्रे व गाणितशास्त्र इत्यादी अनेक विषयांचा अभ्यास होतो...
संकलन :- मुक्तीदाता विशेषांक
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या