डबडबल्या डोळ्यांनी अजित पवारांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Final farewell to Ajit Pawar with tearful eyes; funeral)
बारामती :- "अजित दादा परत या...", "अजित दादा अमर रहे..." अशा गगनभेदी घोषणा, हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि जनसागराच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अवघा महाराष्ट्र आज सुन्न असून निःशब्द आहे. अजित पवारांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी देशातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब या दुःखद प्रसंगी एकत्र होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, मंत्री पंकजा मुंडे, निलम गोऱ्हे, आदिती तटकरे, विजय वडेट्टीवार यांनीही आपल्या लाडक्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप दिला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह विविध राज्यांतील मंत्री आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पुर्वी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले महाराष्ट्र शासनाच्या वतीने अजित पवार यांना पूर्ण शासकीय इतमामात निरोप देण्यात आला. पोलिस दलाच्या वतीने हवेत तीन वेळा फायर करुन सलामी देण्यात आली असून मानवंदना देण्यात आली. यावेळी जनसमुदाय निःशब्द झाला, जेव्हा पोलिसांच्या तुकडीने हवेत गोळ्या झाडून मानवंदना दिली, तेव्हा उपस्थित जनसागराने 'एकच वादा, अजित दादा', अजित दादा अमर रहे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पार्थ पवार, जय पवार यांनी मुखाग्नी दिला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांचे अश्रू अनावर झाले होते, ते पाहून उपस्थित जनसमुदायही हेलावून गेला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या