मिलो ना तुम तो हम घबराए, मिलो तो आँख चुराए : भाजप कार्यकर्ते संभ्रमात

Vidyanshnewslive
By -
0
मिलो ना तुम तो हम घबराए, मिलो तो आँख चुराए : भाजप कार्यकर्ते संभ्रमात

चंद्रपूर :- महाराष्ट्रभर भाजपाची सत्ता आज एकहाती आणि भक्कम आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचे कमळ फुलले आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर चंद्रपूरचा पराभव अधिक ठळकपणे डोळ्यात भरतो. इथे सत्ता हातातून निसटली... हा पराभव अपघाती नसून, नेत्यांच्या गटबाजीचा, अहंकाराचा आणि कार्यकर्त्यांकडे झालेल्या दुर्लक्षाचा परिणाम असल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे. चंद्रपूरमध्ये आज प्रामाणिक कार्यकर्ते संभ्रमात आहे. कुणाकडे जायचं, कुणाशी बोलायचं, कुणाच्या कार्यक्रमात उपस्थित राहायचं.. या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या काट्यावर तोलल्या जात आहेत. एका नेत्याशी संवाद साधला तर दुसऱ्या गटात गैरसमज निर्माण होतो. कोणत्या वर्तुळात उठबस आहे, यावर कार्यकर्त्याचे महत्त्व ठरवले जात आहे. अशा वातावरणात निर्भीडपणे काम करण्याची हिंमत हळूहळू संपत चालली आहे. या परिस्थितीचा सर्वात धोकादायक परिणाम असा आहे की प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्ते हळूहळू बाजूला सरकू लागतात. ते गोंधळ घालत नाहीत, आरडाओरड करत नाहीत ते शांतपणे निघून जातात. आणि त्यांच्या जागी जे उरतात, ते सत्ता, पैसा आणि स्वार्थाचा मलिदा खाणारे... नेत्यांच्या अवतीभवती गर्दी दिसते खरी, पण ती गर्दी कार्यकर्त्यांची कमी अन् फायदेखोरांची जास्त असते. कार्यकर्ता मात्र एकदा गमावला की कायमचा गमावला जातो, हे वास्तव नेत्यांनी ओळखायला हवे.. निवडणूक फक्त पैशाच्या जोरावर जिंकता येत नाही, हे इतिहासाने पुन्हा पुन्हा सिद्ध केले आहे. आज जेव्हा सत्ता, साधनसामग्री आणि संसाधने उपलब्ध आहेत, तेव्हा कार्यकर्त्यांचे महत्त्व कमी लेखले जात आहे. पण नेत्यांनी मागे वळून पाहावे जेव्हा काहीच नव्हते, जेव्हा पैसा नव्हता, सत्ता नव्हती, तेव्हा याच कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला, विश्वास निर्माण केला आणि तुम्हाला निवडून दिले. त्या काळात पैसा नव्हता, पण निष्ठा होती; सत्ता नव्हती, पण समर्पण होते... चंद्रपूर महानगरपालिकेतील पराभव हा याच विस्मरणाचा परिणाम आहे. महाराष्ट्रभर भाजप जिंकत असताना चंद्रपूर हरतोय याचा अर्थ इथे विरोधक बळकट होते असा नसून, आपली संघटना आतून कमकुवत झाली, असा आहे. गटबाजीने संवाद संपवला, अहंकाराने संघटन पोखरले आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास मोडला..
              “मिलो ना तुम तो हम घबराए, 
                     मिलो तो आँख चुराए” 
ही ओळ आज चंद्रपूर भाजप कार्यकर्त्यांची मनःस्थिती अचूकपणे मांडते... जर कामानिमित्त एखाद्या नेत्याला भेटायला जायचं ... दुसऱ्या नेत्याला कळलं तर काय?? म्हणून भीती, आणि भेटलेच तर कुणाचा रोष ओढावेल या भीतीने डोळे चुकवण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. ही अवस्था संघटनेसाठी धोक्याची घंटा आहे.. नेत्यांनी हे लक्षात घ्यावे की पक्ष कोणाची जहागीर नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांचा संभाळ केला नाही, तर ते दुरावतील आणि तेव्हा ना निवडणूक जिंकण्यासाठी माणसं उरतील, ना पराभवाचे खापर फोडण्यासाठी कुणी सापडेल... आजही वेळ आहे, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या, नाहीतर इतिहास पुन्हा एकदा तोच धडा अधिक कठोरपणे शिकवेल... 

संकलन :- समीर मोहनराव केने(ज्येष्ठ पत्रकार, बल्लारपूर)

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)