रणसंग्राम नगरपरिषद/नगर पंचायत निवडणुकीचा, चंद्रपुरात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला (Ransangram Municipal Council/Nagar Panchayat elections, reputation of stalwarts at stake in Chandrapur)

Vidyanshnewslive
By -
0
रणसंग्राम नगरपरिषद/नगर पंचायत निवडणुकीचा, चंद्रपुरात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला (Ransangram Municipal Council/Nagar Panchayat elections, reputation of stalwarts at stake in Chandrapur)

जिल्ह्यात १० नगरपालिका, १ नगर पंचायतसाठी निवडणूक

चंद्रपूर : जिल्ह्यातील १० नगरपालिका व १ नगर पंचायतसाठी निवडणूक जाहीर झाली असून माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे आणि करण देवतळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील बल्लारपूर, मूल, राजुरा, गडचांदुर, ब्रह्मपुरी, चिमूर, नागभीड, वरोरा, भद्रावती, घुग्घूस या दहा नगरपालिका तथा भिसी या एका नगर पंचायतीची निवडणूक होणार आहे. मुनगंटीवार प्रतिनिधित्व करणाऱ्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात बल्लारपूर व मूल या दोन नगरपालिका आहेत. या दोन्ही पालिकेत यापूर्वी भाजपची सत्ता होती. यामुळे मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बल्लारपूर व मूल या दोन्ही शहरांत काँग्रेस पक्ष काहीसा कमकुवत आहे. त्यामुळे येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह काँग्रेस नेत्यांना आपसातील मतभेद विसरून काम करावे लागणार आहे. काँग्रेस आमदार वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरी व नागभीड या दोन नगरपालिका काबीज करण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. या दोन्ही पालिकेत काँग्रेसची सत्ता होती. येथे भाजपचे माजी आमदार अतुल देशकर तथा समर्थकांवर जबाबदारी असेल. चिमूर नगरपालिका तथा भिसी नगर पंचायत येथे भाजप आमदार भांगडिया यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. येथे काँग्रेसकडे माजी आमदार अविनाश वारजूकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतिश वारजूकर यांच्याशिवाय दुसरा चेहरा नाही. त्यामुळे येथेही वडेट्टीवार यांना लक्ष द्यावे लागणार आहे. खासदार धानोरकर यांच्या वरोरा या गृह मतदारसंघात वरोरा व भद्रावती या दोन नगर पालिका येतात. वरोऱ्यात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असले तरी भद्रावती पालिकेत माजी नगराध्यक्ष तथा खासदारांचे भासरे अनिल धानोरकर यांचेच त्यांच्यापुढे आव्हान आहे. भद्रावती येथे काँग्रेस कमकुवत आहे. खासदार धानोरकर विरुद्ध सर्व, अशी स्थिती येथे आहे. त्यामुळे खासदार धानोरकर यांना परिश्रम घ्यावे लागेल. येथे भाजपचे आमदार करण देवतळे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे मुकेश जीवतोडे यांना परिश्रम घ्यावे लागेल. आमदार भोंगळे यांचा राजुरा व गडचांदूर नगरपालिका निवडणुकीत कस लागणार आहे. येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष धोटे यांनाही परिश्रम घ्यावे लागेल. चंद्रपूर मतदारसंघातील घुग्घुस नगरपालिकेत भाजप आमदार जोरगेवार यांची खरी कसोटी आहे. घुग्घुस पालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे काँग्रेस नेतेही सक्रिय झाले आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)