चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर पहिल्यांदाच दोन दिवसीय अंधांचे बौद्ध धम्म संमेलन (For the first time, a two-day Buddhist conference for the blind was held at Chandrapur's Deekshabhoomi.)
चंद्रपूर :- दि. बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाईंड, नाशिक या संस्थेच्या वतीने चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर शनिवार, १ व २ नोव्हेंबर रोजी अंध व्यक्तींचे दोन दिवसीय बौद्ध धम्म संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता या संमेलनाचा शुभारंभ होणार असून संपूर्ण राज्यातून १०० ते १५० अंध व्यक्ती या संमेलनात सहभागी होणार आहेत. चंद्रपूरात प्रथमच अंधांसाठी बौद्ध धम्म संमेलनाचे आयोजन होत असून ते येथील नागरिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे, अशी माहिती आयोजक समितीचे प्रमुख सतिश शेंडे यांनी आज श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. अंध व्यक्तींना धम्माची सखोल माहिती व बौद्ध साहित्याचे ज्ञान मिळावे, त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून म. फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष चेतन उंदिरवाडे, संघर्ष बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किशोर सवाणे, राजेश गायकवाड तर विशेष अतिथी म्हणून बौद्ध महासभेचे सचिव संदीप सोनवणे व कोषाध्यक्ष गुरु मेश्राम उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी ,१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत बौद्ध धम्मातील पूजा व साहित्याचे महत्त्व या विषयावर कृष्णाक पेरकवार भाषण देतील. त्यानंतर बौद्धाचे सण व मंगलदिन या विषयावर संगिता अलोणे आपले विचार मांडतील. दुपारी ३ ते ४ या वेळेत बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी धम्म हा विषय डॉ. राजेश आसुधानी मांडतील, तर राष्ट्रनिर्माण भान आणि भूमिका या विषयावर धनराज लोखंडे मार्गदर्शन करतील. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत सपना कुंभारे बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये या विषयावर भाषण करतील. संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत भीम-बौद्ध गीतांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता भैय्यासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य या विषयावर किशोर तेलतुंबडे, बुद्धाचा धम्म हाच कल्याणकारी धम्म आहे या विषयावर मोहन देठे, तर स्त्रियांचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर मंदाकिनी दुधे विचार मांडतील. समारोपीय कार्यक्रमात किशोर तेलतुंबडे, संगिता घोडेस्वार, डॉ. इसादास भडके, डॉ. रवि मुरमाडे, राजेश मडावी तसेच निवृत्त पोलीस अधिकारी पठाण उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय धम्म संमेलनास जिल्ह्यातील जास्तीत जास्त अंध व्यक्तींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सतिश निकम, राजाराम गायकवाड, स्थानिक आयोजक सतिश शेंडे, किशोर तेलतुंबडे (अध्यक्ष – भारतीय बौद्ध महासभा, चंद्रपूर पश्चिम विभाग), दिलीप गेडाम, भारत पचारे, अशोक घोडेस्वार, विकास शेजवड व शेषराव सहारे यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या