ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारकाचा विकास आराखडा सादर (Instructions to submit development plan for historic Bhima Koregaon Vijaystambh memorial)
महार रेजिमेंटचे संग्रहालय, वॉर मेमोरियल, ग्रंथालय, सभागृह, बुकस्टॉल उभारणार
पुणे :- १ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभ स्मारकास मानवंदना देण्यासाठी देशातील विविध राज्यातून लाखोच्या संख्येने भीम अनुयायी नागरिक येत असतात. याही वर्षी मोठ्या प्रमाणात एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे हा कार्यक्रम साजरा व्हावा या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करीत आहे, त्याचाच भाग म्हणून मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भीमा कोरेगाव संदर्भात सातत्याने विकास आराखड्यासंदर्भात बैठका होत आहेत. ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारकास राज्य शासनाने राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन विकास करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटनांनी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. भीमसैनिकांची मागणी लक्षात घेऊन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारकाचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनास दिले होते. पुण्याचे जिल्हाधिकारी तथा भीमा कोरेगाव शौर्य दिन शासकीय समितीचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी भीमा कोरेगाव स्मारकाचा विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सादर करावा असे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने भीमा कोरेगाव स्मारकाचा विकास आराखडा तयार करून तो आज मा. जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे सादर केला. या विकास आराखड्यामध्ये भव्य स्मारक, ग्रंथालय, महार रेजिमेंटचे संग्रहालय, सभागृह, गार्डन, पार्किंग, बुक स्टॉल, भीमा नदीचे सौंदर्यीकरण, वॉर मेमोरियल, आदीचा समावेश करण्यात आला आहे.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी विजयस्तंभ स्मारकास मानवंदना देऊन भीम सैनिकांशी संवाद साधला होता. तसेच त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात विजय स्तंभ स्मारकास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे आणि स्मारकाच्या विकासासाठी १०० कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले होते. तसेच स्मारकाचा कायमस्वरूपी आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२५ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन शासकीय समितीचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारक परिसरातील जागेवर कायमस्वरूपी सुविधा निर्माण करणे आणि विकास आराखडा याविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विशाल लोंढे यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी १०० कोटी रुपयाचा भरघोस निधी भीमा कोरेगाव स्मारकास उपलब्ध करून दिला असून स्मारकाची देखरेख व नियंत्रण बार्टीकडेच राहील असे सांगितले. या बैठकीला, गजानन पाटील-मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे, सोमय मुंढे-पोलिस उपायुक्त, परिमंडळ ४ पुणे, भरतकुमार बाविस्कर-अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, श्रीमती ज्योती कदम-निवासी उपजिल्हाधिकारी पुणे, वंदना कोचुरे-सदस्य सचिव भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन शासकिय समिती तथा प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे विभाग, विशाल लोंढे-सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी निबंधक (बार्टी) पुणे, यशवंत माने-प्रांत अधिकारी हवेली, सर्जेराव कुंभार-पोलिस निरीक्षक लोणिकंद पोलिस स्टेशन, बार्टीचे सुमेध थोरात, रामदास लोखंडे यांच्यासह प्रशासनातील अनेक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या