केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून माओवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल वरिष्ठांसह एकूण ६१ सदस्यांनी केले सशस्र आत्मसमर्पण (A total of 61 members of the Maoist Central Committee, including many senior leaders, surrendered armed due to the efforts of the central and state governments.)
गडचिरोली :- केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून माओवादी केंद्रीय समितीच्या अनेक जहाल वरिष्ठांसह एकूण ६१ सदस्यांनी सशस्र आत्मसमर्पण केले. ही माओवादाच्या समाप्तीची सुरुवात असून माओवाद १०० टक्के हद्दपार होणार, अशा परिस्थितीत आज आपण पोहोचलो असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. या लढाईचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा करत आहे, हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा मुद्दा आहे असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. आजचे सशस्र आत्मसमर्पण ही देशाच्या इतिहासातील अत्यंत मोठी घटना असून नवीन इतिहास लिहिल्या गेला आहे. यापूर्वी उत्तर गडचिरोलीतून माओवाद संपुष्टात आणण्यात आला आहे, आजच्या या आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीतील माओवादही संपुष्टात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जे काही ८ ते १० माओवादी शिल्लक आहेत, त्यांना आत्मसमर्पण करून मुख्य धारेत येण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला.
समता व न्याय फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित संविधानातूनच येऊ शकते या वास्तविकतेची जाणीव झाल्याने माओवादी चळवळीच्या नादी लागलेले आता आत्मसर्पण करत आहेत. आत्मसमर्पण करणाऱ्यांना संविधानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. "संविधानाचा आदर करेल, त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होईल असा संदेश आम्ही आत्मसमर्पितांच्या पुनर्वसनातून देऊ," असे आश्वासन त्यांनी दिले. आजच्या आत्मसमर्पणानंतर सर्व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना पुनर्वसनासाठी एकत्रितपणे एकूण ३ कोटी ०१ लाख ५५ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून माओवादाविरुद्ध ठरवलेल्या धोरणाचे आणि गृहमंत्री अमित शाह यांनी २०२६ पर्यंत माओवाद संपवण्यासाठी केलेल्या रणनीतीचे कौतुक केले. या धोरणात आत्मसमर्पणातून मुख्य प्रवाहात सामील होणे किंवा पोलिस कारवाईला सामोरे जाणे हे दोनच पर्याय ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे देशातून मोठ्या प्रमाणात माओवादाचे उच्चाटन होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली पोलिस दलाचे आणि केंद्रीय राखीव दलाचे अभिनंदन केले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांनी गडचिरोली पोलिस दलाला १ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या