बल्लारपूरसह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात दिले निवेदन, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट (A statement was given regarding solving various problems in Chandrapur district including Ballarpur, MLA Sudhir Mungantiwar met Union Railway Minister Shri Ashwini Vaishnav)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरसह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात दिले निवेदन, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट (A statement was given regarding solving various problems in Chandrapur district including Ballarpur, MLA Sudhir Mungantiwar met Union Railway Minister Shri Ashwini Vaishnav)

ना. अश्विनी वैष्णव यांनी बल्लारपूर आणि चंद्रपूरच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा दिला शब्द

चंद्रपूर - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री ना. श्री. अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन चंद्रपूरमधील विविध समस्या सोडविण्याच्या संदर्भात निवेदन दिले. यामध्ये बल्लारपूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील ठळक विषयांच्या संदर्भातील निवेदनांचा समावेश होता. ना. श्री. अश्विनी वैष्णव यांनी चंद्रपूरच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन तातडीने निराकरण करण्याचा शब्द आ. श्री. मुनगंटीवार यांना दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात वस्ती विभागातील गोल पुलिया हा नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. सध्या रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या लाईनचे काम सुरू असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अश्या परिस्थितीत गोल पुलिया जवळील रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता आहे, ही बाब आ. श्री. मुनगंटीवार यांनी निवेदनाच्या माध्यमातून ना. श्री. अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिली. बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. स्थानकातील सुविधा, प्रवाशांच्या गरजा आणि आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन बैठक घेण्यात यावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी सविस्तर चर्चा करत रेल्वे मंत्री ना. श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशन यार्ड, सावरकर नगर, रय्यतवारी व लखमापूर परिसरात नवीन रेल्वे लाईनच्या कामामुळे मागील २५ वर्षांपासून राहणाऱ्या मजूर कुटुंबांना स्थलांतराची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून या कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन होणे अत्यावश्यक आहे, ही बाब आ. श्री. मुनगंटीवार यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली.
               बल्लारपूर येथील मध्य रेल्वेच्या मालकीच्या जागेवर गेल्या ४०-४५ वर्षांपासून विविध व्यापारी आपला व्यवसाय करत आहेत. ही जागा रेल्वेकडून लीजवर देण्यात आलेली आहे. रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली यांच्या दि. २६-०७-२००४ च्या पत्रानुसार, अशा प्रकरणांमध्ये मूळ लायसन्सधारकांच्या जागी सध्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अपवादात्मक स्वरूपात नवीन करार (Agreement) करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासन, नागपूर मंडळाने २०११ मध्ये सर्वेक्षण करून ९ व्यापाऱ्यांचे नवीन करार करण्यास मान्यता दिली होती. मात्र, आजपर्यंत संबंधित व्यापाऱ्यांना नवे करार देण्यात आलेले नाहीत. काही व्यापाऱ्यांनी या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केल्या असून न्यायालयाने रेल्वेला याबाबत कारणे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बल्लारपूर शहरातील रेल्वेच्या जागेवर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांशी नवीन भूमी करार करण्यास आवश्यक ती तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, जेणेकरून दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागेल आणि स्थानिक व्यापाऱ्यांना न्याय मिळेल, अशी विनंती आ. श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांना केली. सर्व मुद्द्यांवर मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. बल्लारपूर आणि चंद्रपूरच्या जनतेच्या अपेक्षा आणि विकासाचा अजेंडा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न निश्चितच फलद्रूप ठरेल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)