दीक्षाभूमीतून महाबोधी महाविहार मुक्तीचा संकल्प; भंते विनाचार्यकडून देशव्यापी आंदोलनाचे आवाहन (Resolution to liberate Mahabodhi Mahavihara from Deeksha Bhoomi; Venerable Vinacharya calls for nationwide movement)
नागपूर :- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ऐतिहासिक धम्मक्रांती करत देशात बौद्ध धम्म पुनर्स्थापित केला, आता. त्यांचे लाखो अनुयायी बौद्धांसाठी पवित्र असलेल्या महाबोधी महाविहार मुक्त करतील आणि बाबासाहेबांचा सन्मान वाढवतील असा संदेश देत मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनाचार्य यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या मंचावरून देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले. यावेळी उपस्थित जनसमूहाला संबोधित करताना भंते विनाचार्य म्हणाले,' धम्मक्रांती केल्यावर बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न बघितले होते. मात्र भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेले महत्वाचे ठिकाण बौद्धांच्या हातात नसल्यामुळे बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराला गती मिळाली नाही. त्यामुळे बोधगया महाविहार मुक्त करणे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतीमान करण्यासाठी गरजेचे आहे.'
६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून भंते विनाचार्य बोलत होते. मंचावर सारनाथ येथील भदंत चंद्रिमा थेरो, चंदीगढ येथील आयएएस अधिकारी राजशेखर वृंदू यांच्यासह दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई उपस्थित होते. बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिल्यावर मागील ६९ वर्षात झालेल्या परिवर्तनाचे मूल्यांकन करण्यासाठी स्मारक समितीने विशेष अधिवेशनासाठी पुढाकार घ्यावा आणि हे मूल्यांकन झाल्यावर देशातील बौद्धांचे नेतृत्व या पवित्र दीक्षाभूमीतून व्हावे. आम्ही सर्व सोबत चालायला तयार आहोत, अशा भावना भदंत चंद्रिमा थेरो यांनी व्यक्त केल्या. राजशेखर यांनी सांगितले की बाबासाहेबांची रक्तविहीन धम्मक्रांती सामाजिक विषमतेच्या विरोधातील लढा होता. बाबासाहेबांनी मानवाचा मानवाशी असलेला संबंध प्रतिपादित करत सामाजिक बदलाकडे घेऊन जाणारी तार्किक चळवळ सुरू केली, असेही ते म्हणाले. दीक्षाभूमीवर गुरुवारी लाखोंचा भीमसागर उसळला. दीक्षाभूमी मध्यवर्ती स्तुपात बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी दिवसभर लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या. यात कर्नाटक,तेलंगाना, तमिळनाडू या दक्षिण भारतातील राज्यांसह बिहार, गुजरात या राज्यांसह देश विदेशातून मोठ्या संख्येत अनुयायी उपस्थित होते. दीक्षाभूमीवर सकाळी ९ वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई आणि भिक्खु संघाच्या उपस्थित सामूहिक बुद्ध वंदना आणि बावीस प्रतिज्ञांचे वाचन झाले. सायंकाळी मुख्य सोहळ्यानंतर संविधान या महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान, उच्च न्यायालयाने फटकारल्यावर स्थानिक प्रशासनाने अनुयायांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी पुरजोर प्रयत्न केले आणि त्यात बऱ्याच प्रमाणात यशही मिळविले, स्वयंसेवी संस्थाकडूनही अनुयायांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या