बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा-बल्लारशाह जंगल सफारीचा शुभारंभ (Launch of Karwa-Ballarshah Jungle Safari in Ballarshah Forest Area)
बल्लारपूर :- मध्य चांदा वनविभागांतर्गत बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा-बल्लारशाह जंगल सफारीचा शुभारंभ २० ऑक्टोबर रोजी करण्यात आला. या प्रसंगी ईको टुरिझम बोर्डाचे सदस्य अरुण तिखे व प्रकाश धारणे यांच्या हस्ते रिबीन कापून हिरवा झेंडा दाखवून सफारीचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी सफारी दरम्यान पर्यटकांना बिबट, अस्वल, इंडियन गौर (बायसन), निलगाय, सांबर, चितळ, रानडुक्कर, मोर आणि इगलसह विविध वन्यप्राणी दिसून आले. सफारीचा अनुभव घेण्यासाठी सकाळची फेरी सकाळी ६ ते १० व दुपारची फेरी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत खुली राहणार असून प्रत्येक फेरीसाठी १२ वाहनांना प्रवेश दिला जात आहे. एकूण ७० किलोमीटरच्या पर्यटन मार्गावरून पर्यटकांना वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्री, तसेच विविध पक्षी आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव घेता येणार आहे.
या वेळी सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र द. घोरुडे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती कारवा अध्यक्ष विनोद सिडाम यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनावेळी आलेल्या पर्यटकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी मान्यवरांनी पर्यटकांना निसर्गाचा साक्षात अनुभव घ्या आणि स्थानिक पर्यटनाला चालना द्या असे आवाहन केले. या वेळी क्षेत्र सहाय्यक विजय रामटेके, देवराव टेकाम, वनरक्षक सुधीर बोकडे सचिव, JFM कारवा, आशिष देवगडे, सुनील नन्नावरे, उषा घोळवे, पूजा टोंगे, माया पवार, शितल कुळमेथे, बायोलॉजिस्ट नुर अली, तसेच जिप्सी मालक, चालक, मार्गदर्शक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068






टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या