जागतिक तापमानवाढ व प्रतिबंध या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे वन अकादमीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजन (One-day workshop on global warming and prevention organized for school students at Forest Academy)
चंद्रपूर :- राष्ट्रीय वननीती 1988 व महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धन बाबत व्यापक जनजागृतीच्या अनुषंगाने जागतिक तापमानवाढ व प्रतिबंध या विषयावर चंद्रपूर वन अकादमी येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर शहरातील एकुण 9 शाळेतून 81 विद्यार्थी आणि 9 शिक्षकांनी यात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. कार्यशाळा दरम्यान तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक तापमानवाढ, कार्बन फुटप्रिंट, अक्षय उर्जा स्त्रोत, जैवविविधतेचे संवर्धन आणि समुदाय स्तरावर करता येणाऱ्या उपाययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच बल्लारपूर येथील मोठा लाकुड आणि विसापूर येथील वनस्पती उद्यानात अभ्यासभेट घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वनस्पतीचे निरिक्षण केले आणि त्या हवामान समतोल व कार्बन शोषणात कशाप्रकारे मदत करतात, हे प्रत्यक्ष अनुभवले. उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना वनप्रबोधीनी कडून प्रमाणपत्र देण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाण निर्माण करण्याचा दृष्टिने अत्यंत उपयुक्त ठरला. चंद्रपूर वन अकादमी भविष्यातही दर आठवडयात फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय संस्थांमधील विद्यार्थीचे अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम आयोजीत करून पर्यावरण संरक्षणात युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा प्रयत्नशील राहील. सदर कार्यक्रम वन अकादमी चंद्रपूरचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली व अपर संचालक (प्रशिक्षण) उमेश वर्मा यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. कार्यक्रमाकरीता शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश पाताळे, सत्र संचालक एस .एस दहिवले, नरेंद्र चेटुले व इतर अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या