शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक, आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच केंद्रबिंदू - शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Educational Quality Review Meeting, Pleasant and Quality Education is the focal point - Education Minister Dadaji Bhuse)

Vidyanshnewslive
By -
0
शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक, आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच केंद्रबिंदू - शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Educational Quality Review Meeting, Pleasant and Quality Education is the focal point - Education Minister Dadaji Bhuse)


चंद्रपूर : विद्यार्थी हे आपले दैवत आहे. त्यांना चांगले शिक्षण देणे व त्यांच्यातील कलागुणांना विकसित करणे, हे प्रत्येक शिक्षकाचे ध्येय असावे. आज कृत्रिम तंत्रज्ञान व ई- माध्यमे यांच्या युगातही विद्यार्थ्यांची जमिनीशी नाळ तुटणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अभ्यासक्रमासोबतच खेळ, कला आदी बाबींना प्राधान्य द्यावे. आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच विकासाचा मुख्य केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. जिल्हा परिषद येथे आयोजित शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत, विभागीय शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, राजेश पाताळे, मुख्य लेखाधिकारी अतुल गायकवाड, विनीत मत्ते आदी उपस्थित होते.
               चंद्रपूर येथील शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीत अनेक चांगल्या मुद्यांचे सादरीकरण झाले, असे सांगून शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, आयडॉल शिक्षकांच्या उपक्रमांचा इतरांनीही आदर्श घ्यावा. त्यांनी केलेले काम केवळ त्यांच्या शाळेपुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण केंद्रातील शाळांनी त्याचे अनुकरण करावे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावरील शाळांना भेटी द्याव्यात. त्यामुळे स्थानिक स्तरावर छोट्या छोट्या अडीअडचणींची माहिती होते व हे प्रश्न सहजासहजी सुटण्यास मदत होते. शाळांच्या भौतिक सुविधांना शासनाने प्राधान्य दिले आहे. यात शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता, स्वच्छ शौचालय, इमारतींची देखभाल दुरुस्ती, ई- सुविधा, वाचनालय, क्रीडांगण लॅब या बाबींचा समावेश आहे. शाळांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावर सी.एस.आर फंड, खनिज विकास निधी व इतर स्त्रोतातूनही निधी उपलब्ध होऊ शकतो. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पालकांच्या उपस्थित करावी. प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार आहे. पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा इयत्ता 4 थी आणि 7 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करण्याचे नियोजन आहे. पुढे मंत्री श्री. भुसे म्हणाले, शाळांची पटसंख्या वाढविणे आवश्यक असून आधार अपार मध्ये काम वाढवावे. निपुण शाळा अभियानामध्ये अधिक मेहनत घ्यावी. जिल्हास्तरापासून तालुकास्तरापर्यंत शैक्षणिक कामे या महिन्याअखेर पर्यंत मार्गी लावावी. जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी राज्यस्तरीय अटल क्रीडा स्पर्धा तसेच कलागुणांना वाव मिळण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कला स्पर्धा आयोजित करण्यात येतील. येत्या 15 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर कवायत उपक्रम राज्यस्तरावर राबविण्यात येणार आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
            तत्परता आणि कल्पकतेने विद्यार्थी घडवा आमदार किशोर जोरगेवार जिल्ह्यातील सर्व आयडॉल शिक्षकांना बोलण्याची संधी शालेय शिक्षक मंत्री दादाजी भुसे यांनी उपलब्ध करून दिली. जिल्ह्यातील 50 आयडॉल शिक्षकांनी राबविलेले उपक्रम कौतुकास्पद असून तत्परता आणि कल्पकतेने आपण विद्यार्थी घडवू शकतो. या शिक्षकांचे मोठे योगदान आहे. सर्व शिक्षकांनी नवउपक्रम पूर्ण क्षमतेने राबवावे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आयडॉल शिक्षकांची संख्या सर्वाधिक असावी, अशी अपेक्षा आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणीही त्यांनी केली. आयडॉल शिक्षकांनी केले सादरीकरण शाळेच्या भौतिक सुविधेसोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षणाने शाळांचा कायापालट करणाऱ्या आयडॉल शिक्षकांनी शिक्षण मंत्र्यांसमोर आपापल्या शाळांचे सादरीकरण केले. यात शिक्षक दीपक गोतावळे, अविनाश जुमडे, गिरीधर पानघाटे, मोहिनी देशमुख, सविता झाडे, अजय मुसळे, अली अजाणी, शिल्पा ठाकरे, सोनाली चारवळ या शिक्षकांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे आणि राजेश पातळे यांनी केले. संचालन विवेक इत्तडवार यांनी तर आभार उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख यांनी मानले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)